‘एफटीआयआय’च्या (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) तीन उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांपैकी एकाला शुक्रवारी संध्याकाळी प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली आणि राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांना पत्र लिहिले असून त्यात विद्यार्थ्यांशी एफटीआयआयचा तिढा तातडीने चर्चा करुन सोडवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
एफटीआयआयच्या संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या व इतर चार सदस्यांच्या नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या संपाचा शुक्रवारी ९२ वा दिवस होता. गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून आंदोलक विद्यार्थ्यांपैकी अलोक आरोडा, हिमांशू शेखर आणि हिलाल सवाद या तिघांनी संस्थेच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले. यातील हिलाल याची प्रकृती शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता बिघडली. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे त्याला भांडारकर रस्त्याजवळील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. हिलालची प्रकृती बिघडली तेव्हा संस्थेचे निबंधक यू. सी. बोडके त्या ठिकाणी उपस्थित होते अशी माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली. हिलाल याच्या जागी लागलीच दुसरा आंदोलक विद्यार्थी अंकित थापा उपोषणाला बसला आहे, तसेच इतर दोघांचे उपोषणही सुरू आहे. याविषयी संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा आणि चीड असल्याचे विद्यार्थी संघटनेतर्फे सांगण्यात आले. ‘अशा क्रूर आणि असंवेदनशील सरकारला आपण निवडून दिले होते का?, लोकशाही सरकारने नागरिकांचे हित पाहणे अपेक्षित आहे, पण सरकार लोकशाहीच्या मुखवटय़ाखाली स्वहित जपताना दिसते. लोकांना ज्या सरकारविषयी एके काळी आशा होत्या त्यांचा विश्वास उडू लागला आहे,’ असे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही शाळकरी मुले नाहीत; त्याचे म्हणणे ऐकून घ्या – गोविंद निहलानी
‘सरकारने एफटीआयआय प्रकरणाचा प्रतिष्ठेचा प्रश्न करु नये. विद्यार्थ्यांच्या बोलण्यात मुद्दा आहे आणि तो लक्षात घ्यायला हवा. ही शाळकरी मुले नाहीत. त्यांनी व्यक्त केलेली भीती आणि धास्ती याकडे लक्ष द्यायला हवे. त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घ्यायला हवे,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शुक्रवारी रात्री ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनीही संस्थेला भेट दिली.