नवे विषय, वेगळा आशय आणि उत्तम मांडणी या वैशिष्टय़ांमुळे समांतर चित्रपटांची चळवळ केवळ मराठीमध्येच टिकून असल्याचे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी शनिवारी व्यक्त केले. अन्य कोणत्याही भाषेमध्ये असे जाणीवपूर्वक प्रयत्न होत नसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते गोविंद निहलानी यांना राजा परांजपे सन्मान प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे आणि अजय राणे या प्रसंगी उपस्थित होते. उत्तरार्धात योगेश देशपांडे यांनी गोविंद निहलानी यांच्याशी संवाद साधला.
चित्रपटसृष्टीमध्ये मी वेगळे असे काहीच केले नाही. मी चांगला दिग्दर्शक आहे की नाही हे सांगता येणार नाही. योग्य वेळी योग्य माणसे भेटली आणि त्यांनी माझी कारकीर्द घडविली, अशी भावना व्यक्त करून गोविंद निहलानी म्हणाले, चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच निर्माण होतात. मराठीमध्ये व्ही. शांताराम, राजा परांजपे यांनी चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली. स्वातंत्र्याच्या दोन दशकांनंतरही आर्थिक, सामाजिक प्रश्न संपले नाहीत. याचा लोकांच्या मनामध्ये राग होता. त्याचे प्रतिबिंब चित्रपटातही उमटले. सत्यजित रे, सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर, श्याम बेनेगल या दिग्गजांनी चित्रपटांतून समस्या मांडण्याचे धाडस केले आणि त्यातूनच प्रश्न उपस्थित करण्याची नवी दृष्टी मिळाली.
सामाजिक व्यवस्था, राजकारण, अर्थकारण याप्रमाणे चित्रपट देखील बदलत असतो. पूर्वीच्या चित्रपटांतून समाज आणि देशहिताला प्राधान्य होते. आता जागतिकीकरणाचा आणि ‘इंडिया शायनिंग’चा जमाना आहे. मनोरंजनासाठी असलेल्या चित्रपटांची वाटचाल सवंग मनोरंजनाकडे होत आहे. ‘अर्धसत्य’मधील ‘वेलणकर’ आणि सध्याच्या ‘दबंग’मधील ‘चुलबुल पांडे’ ही पोलिसाची दोन रूपे त्याचेच द्योतक आहेत. विनोदाच्या माध्यमातून पोलीस या समाज घटकाचे विद्रूपीकरण केले जात असल्याची खंतही निहलानी यांनी व्यक्त केली. ‘अर्धसत्य’च्या यशाचे श्रेय विजय तेंडुलकरांचेच आहे. विस्थापितांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘तमस’ मालिकेमध्ये भीष्म सहानी यांचे मोठे योगदान आहे. जेव्हा राजकीय स्वार्थासाठी धर्म-जातीचा वापर होतो, तेव्हा त्यामध्ये गरीब माणसाचाच बळी जातो. फाळणीच्या काळात तीन लाख लोकांचा बळी घेतला गेला, असेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र ताकद
ओम पुरी, नसिरुद्दीन शाह आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये आपल्याला कोणाचा अभिनय महत्त्वाचा वाटतो असे विचारले असता गोविंद निहलानी म्हणाले, गरीब-शोषिताची वंचना आणि राग प्रभावीपणे दाखवू शकणारा आणि प्रत्येक व्यक्तिरेखा प्रमाणिकपणे करणारा हे ओम पुरी यांचे वैशिष्टय़ आहे. नागरी संवेदनांचा उत्तम आविष्कार करण्यामध्ये नसीर सामथ्र्यवान आहे. अमिताभ हे तर ‘गिफ्टेड आर्टिस्ट’ आहेत. गंभीर आणि विनोदी व्यक्तिरेखा ताकदीने सादर करणाऱ्या बच्चन यांच्या अभिनयाचा पल्ला अफाट आहे.
समांतर चित्रपटांची चळवळ केवळ मराठीमध्येच
नवे विषय, वेगळा आशय आणि उत्तम मांडणी या वैशिष्टय़ांमुळे समांतर चित्रपटांची चळवळ केवळ मराठीमध्येच टिकून असल्याचे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी शनिवारी व्यक्त केले.

First published on: 21-04-2013 at 02:52 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govind nihalani honoured by raja paranjpe sanman