गायकी अंगाने वादन करणारे ज्येष्ठ संवादिनीवादक.. नाटय़पदे आणि संवादाची तालीम करून अवघ्या शंभर दिवसांत नटसम्राट बालगंधर्व यांच्यासमवेत ‘मानापमान’ नाटकात ‘धैर्यधर’ रंगविणारे.. ज्यांच्या संवादिनीवादनातून केवळ स्वरच नव्हे तर व्यंजनेही वाजतात अशी ख्याती असलेल्या गोविंदराव टेंबे यांची संवादिनी सोमवारी राजा दिनकर केळकर संग्रहालयाकडे सोमवारी सुपूर्द करण्यात आली. शतकापूर्वीचा हा अनमोल ठेवा लाभल्याने संग्रहालयाच्या वाद्य दालनामध्ये या संवादिनीची मोलाची भर पडली आहे.

गोविंदराव टेंबे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांचे पुत्र आणि शिष्य उस्ताद शाकीर खान यांच्या हस्ते ही संवादिनी प्रदान करण्यात आली. टेंबे यांचे नातू दीपक टेंबे, संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि संगीत अभ्यासक संजीव साठे, संचालक सुधन्वा रानडे, नावडीकर म्युझिकल्सचे हेमकांत नावडीकर या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ संवादिनीवादक डॉ. अरिवद थत्ते यांनी या संवादिनीचे वादन केले. ऑर्गनवादक भूषण कुलकर्णी यांनी ‘युवती मना’ या नाटय़पदाची धून वाजविली. संगीत नाटक आणि बोलपटाच्या उदयकाळाचा चालताबोलता इतिहास असलेल्या गोविंदराव टेंबे यांनी १९०५ मध्ये पॅरिस येथून ही संवादिनी मागविली होती. गोविंदरावांनी त्यांच्या हयातीत १९२० पर्यंत महाराष्ट्रात विविध ठिकाणी याच संवादिनीवादनातून अनेक कार्यक्रम सादर केले होते. त्यांचे चिरंजीव माधवराव टेंबे हे देखील उत्तम संवादिनीवादक होते. त्यांनीही त्यांच्या हयातीमध्ये या संवादिनीची जपणूक करून तिचा वापरही केला होता.

टिळक रस्त्यावरील पुलंच्या घरी पं. कुमार गंधर्व यांचे गायन सुरू होते. ‘भीमपलास’ रंगलेला असताना अचानक कुमारजी उठून उभे राहिले. सगळ्यांनी मागे वळून पाहिले तर, गोविंदराव टेंबे हे तेथे आले होते. कुमारजींनी त्यांना हाताला धरून पुढे आणून बसविले आणि दोन तंबोऱ्यामध्ये बसून त्यांनी पुन्हा मैफल सुरू केली, अशी आठवण सांगून साठे म्हणाले, १७ नोव्हेंबर १९१० रोजी नानासाहेब जोगळेकर यांचे निधन झाल्यानंतर गोविंदराव यांनी धैर्यधर करावा, अशी कल्पना आली. ज्या नाटकाला त्यांनी स्वत: संगीत दिले होते त्यातील पदांची तयारी पं. भास्करबुवा बखले यांनी आणि गद्याची तयारी काकासाहेब खाडिलकर यांनी करून घ्यावी, अशी अट गोविंदराव यांनी घातली. २७ फेब्रुवारी १९११ मध्ये निपाणी येथील प्रयोगामध्ये ते बालगंधर्व यांच्यासमवेत धैर्यधर म्हणून रंगमंचावर उभे राहिले आणि पहिल्याच पदाला चार ‘वन्स मोअर’ घेतले होते.

वाद्य हे माणसापेक्षा वेगळे नसते. त्यामुळे संवादिनी ही गोिवदरावांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होती, असे सांगून उस्ताद शाकीर खान यांनी या संवादिनीच्या माध्यमातून मला गोिवदरावांचा आशीर्वाद लाभला, अशी भावना व्यक्त केली.

Story img Loader