‘आरोग्यासह सर्वच क्षेत्रातील संशोधनाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून देशाच्या एकूण अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केली जाणारी तरतूदही अत्यल्प आहे. आरोग्य आणि त्यातील संशोधनास प्राधान्य देणे व त्यासाठी वेगळा निधी पुरवणे गरजेचे आहे,’ असे मत व्यक्त करुन वैद्यकीय संशोधनासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सवरेपचार रुग्णालयातील संशोधन मंडळाच्या दोन दिवसीय वार्षिक परिषदेचे गुरूवारी बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एन. राजदान, राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. डी. टी. मौर्य, बी. जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी, संशोधन मंडळाच्या अध्यक्ष डॉ. एस. के. ठोंबरे आदी या वेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य सरकारचे आरोग्य या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. देशाच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केवळ ६ टक्क्य़ांची तरतूद आहे. माणूस आजारी पडल्यावर त्याला औषध देण्यास सरकार पैसा खर्च करते, पण तो आजारी पडू नये यासाठी काम करणाऱ्या डॉक्टरला मात्र पगार वाढवून दिला जात नाही. अल्प वेतनामुळे आरोग्याच्या सरकारी उपक्रमात येण्यास डॉक्टर इच्छुक नसतात. आरोग्यासह सर्वच क्षेत्रांतील संशोधनाकडेही पूर्ण दुर्लक्ष झाले असून वैद्यकीय संशोधनासाठी विशेष निधीची तरतूद करु.’’
रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या भारंभार चाचण्या करणे आणि त्यांच्यावर औषधांचा मारा करणे खरोखरच गरजेचे असते का, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे राजदान यांनी सांगितले. डॉ. चंदनवाले म्हणाले,‘‘चांगल्या संशोधनासाठी उत्तम दर्जाच्या प्रयोगशाळा आणि इतर पायाभूत सुविधांची आवश्यकता भासते. बी. जे. मधील संशोधनासाठी चटई क्षेत्र वाढवून मिळणे व अर्थसाहाय्य मिळणे गरजेचे आहे.’’
आरोग्यातील संशोधनावर सरकारचे दुर्लक्षच – गिरीश बापट
‘आरोग्यासह सर्वच क्षेत्रातील संशोधनाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून देशाच्या एकूण अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केली जाणारी तरतूदही अत्यल्प आहे,असे मत गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-02-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt ignorance towards health research girish bapat