राज्याबाहेर सुवर्णपेढीचा विस्तार करण्याची इच्छा असूनही काही सरकारी धोरणे अडचणीची ठरत असल्याचे मत रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका यांनी व्यक्त केले. व्यवसायात खुलेपणा आल्यास हा विस्तार शक्य होईल, असे ते म्हणाले.
ठाण्यातील राममारुती रस्त्यावर रांका ज्वेलर्सची नवीन शाखा सुरू होत असून ५ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री विद्या बालन हिच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन होणार आहे, तर पेढीची आठवी शाखा ९ ऑक्टोबरला पुण्यात सातारा रस्त्यावर विवेकानंद पुतळ्याजवळ सुरू होणार आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी फतेचंद रांका, पुखराज रांका, ओमप्रकाश रांका आदी उपस्थित होते.
फतेचंद रांका म्हणाले, ‘‘ब्रँडेड सोन्यात सोन्याच्या नाण्यांचा खप चांगला असला तरी दागिन्यांमध्ये अजूनही ग्राहक सुवर्णपेढय़ांनाच पसंती देत आहेत. दागिन्यांच्या एकूण उलाढालीत ब्रँडेड दागिन्यांची उलाढाल केवळ ३ ते ४ टक्क्य़ांची आहे. दक्षिण भारतातील शहरे, गुजरात आणि मध्य प्रदेशात रांका पेढीच्या विस्ताराचे प्रयत्न असून काही सरकारी धोरणांमुळे त्यात अडचणी येत आहेत.’’
‘टेंपल ज्वेलरी’ ला ग्राहकांची पसंती
पूर्वीच्या काळी गेरू पॉलिश केलेले अधिक वजनाचे सोन्याचे दागिने मिळत असत. अशा जुन्या पद्धतीच्या टेंपल ज्वेलरीला ग्राहक वाढती पसंती देत असल्याचे फतेचंद रांका यांनी सांगितले. याशिवाय सध्या लाखेत घडवलेले सोन्याचे दागिने आणि कुंदन दागिने लोकप्रिय आहेत. तसेच वेगवेगळ्या रंगाच्या सोन्याच्या दागिन्यांनाही खप असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader