थेरगाव येथे दोन एकर जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १७० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यात भाजलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी ३० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड असल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना या उपचारांसाठी दूर जायची गरज पडणार नाही. या सोयीबरोबरच महापालिकेमार्फत स्वस्तात उपचार मिळणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर हे झपाटय़ाने वाढणारे शहर असून कमी कालावधीत नावारूपाला आले आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे १८ ते २० लाखांच्या आसपास आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना स्वस्तामध्ये उपचार देण्याची सोय शहरात केली आहे. त्याचा लाभ शहराबरोबरच आसपासच्या परिसरातील हजारो रुग्ण घेत आहेत.
वायसीएम रुग्णालयात ताण येत असल्याची ओरड नागरिक व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने सुरू असते. रुग्णालये वाढवून जास्तीत जास्त रुग्णांना सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील भाजलेल्या रुग्णांवर उपचारांसाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. या रुग्णांसाठी शहरात भोसरीमध्ये एकच खासगी रुग्णालय आहे. मात्र, खासगी रुग्णालयांचे उपचार गोर-गरिबांना परवडत नाहीत. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात.
भाजलेल्या रुग्णांना तातडीचे उपचार न मिळाल्याने कधी कधी प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे नगरसेवक, लोकप्रतिनिधीही शहरात भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बर्न वॉर्डची सातत्याने मागणी करीत असतात. मात्र, आघाडी सरकारने दीड वर्षांपूर्वी म्हणजेच तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात थेरगाव येथे १७० खाटांचे रुग्णालय व त्याच्या जवळच ३० खाटांचा बर्न वॉर्ड उभरण्यासाठी मंजुरी दिली आहे. कोटय़वधी रुपयांच्या या रुग्णालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. दिलीप वेंगसरकर अॅकॅडमी जवळच असणाऱ्या सुमारे दोन एकर परिसरामध्ये हे सुसज्ज रुग्णालय महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत आहे.

Story img Loader