भाऊसाहेब भोईर काँग्रेसचे नगरसेवक, अजित पवार राष्ट्रवादीचे नेते, मात्र निमंत्रक आणि पाहुणा हे समीकरण पुन्हा जुळून आणले गेले. बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल आणि राजेशकुमार सांकला हे भोईरांचे निकटवर्तीय. मात्र भोईरांच्या पुढाकाराने त्यांना अजितदादांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आल्याने अपेक्षित चर्चा झालीच. खुसखुशीत भाषणांमुळे रंगलेल्या या कार्यक्रमात पुरस्कार्थीपेक्षा अजितदादांचेच जास्त गुणगाण झाले.
िपपरी-चिंचवड प्रतिष्ठानच्या वतीने कॉसमॉस बँकेच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल गोयल यांना ‘सहकार भूषण’ आणि बांधकाम क्षेत्रातील कामगिरीबद्दल सांकलांना ‘िपपरी-चिंचवड भूषण’ पुरस्काराने अजितदादांच्या हस्ते गौरवण्यात आले. महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, रंजना सांकला, आयोजक नगरसेवक भाऊसाहेब भोईर व संतोष पाटील आदी उपस्थित होते. सर्वानी अजितदादांच्या कार्यपध्दतीचे भरभरून कौतुक केले. िपपरी-चिंचवडच्या विकासाचे ते शिल्पकार असल्याचा उल्लेख सर्वानीच केला. गोयल म्हणाले, अजितदादांना मी आदर्श समजतो. १६ ते १८ तास काम करण्याची त्यांची धडाडी पाहून अभिमान वाटतो. शहरातील पहिले मल्टीप्लेक्स अजितदादांमुळे उभे राहिले. पुण्यात कॉसमॉस बँकेचे मुख्यालय त्यांच्यामुळेच मार्गी लागले. ते भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत. सांकला म्हणाले, अजितदादांनी िपपरी-चिंचवडचा कायापालट केला. येथील विकासामुळे जमिनींचे भाव वाढले, सदनिकांना चांगला दर मिळू लागला. औद्योगिक भूखंडांच्या निवासीकरणास मान्यता देऊन त्यांनी आमची मोठी अडचण दूर केली होती. भोईर म्हणाले, सत्तेत असो किंवा नसो, दादा म्हणजे दादा आहेत. १९९९ मध्ये शहरात नाटय़संमेलन झाले, ते यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. अजित पवार म्हणाले, िपपरी-चिंचवडने भरभरून दिले, विकासकामात राजकारण करत नाही. केवळ शहराचे हित पाहतो. गोयल, सांकला ध्येयवेडे आहेत. अशीच माणसे क्रांती घडवतात. भोईरांचे मित्र म्हणून नव्हे तर त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.
‘मार्केटिंग िपपरीचे, राहतात पुण्यात’
राजकुमार सांकला यांनी िपपरी-चिंचवड शहरात नऊ हजार सदनिका बांधल्या, त्या विकण्यासाठी शहराचे त्यांनी ‘मार्केटिंग’ केले. शहरातील विविध वैशिष्टय़ांची जाहिरातही केली. मात्र, स्वत: सांकला हे अजूनही पुण्यातच राहात आहे, असे अजित पवार यांनी सांगताच सभागृहात हशा उसळला.