पोलीस नियंत्रण कक्ष म्हणजे कर्मचाऱ्यांची शिक्षा म्हणून बदली करण्याची जागा.. ही पूर्वीची ओळख आता पुणे ग्रामीण पोलिसांसाठी तरी बदलणार आहे, कारण तेथील नियंत्रण कक्ष कात टाकत आहे. आधीचा परंपरागत व तंत्रज्ञानाचा फारसा स्पर्श नसलेला नियंत्रण कक्ष अत्याधुनिक सोई-सुविधांनी परिपूर्ण करण्यात येत आहे. या ठिकाणी व्हेईकल ट्रेसिंग, जीपीआरएस ट्रॅकर, इंटिग्रेट व्हाईस रेकॉर्डिग सिस्टम, एस.एम.एस. सव्र्हर अशी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरातील नियंत्रण कक्षात बसून येथील अधिकारी संपूर्ण जिल्ह्य़ावर लक्ष ठेवू शकणार आहेत.. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने ‘नियंत्रण’ कक्ष बनणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द मोठी आहे. एकीकडे पश्चिमेला लोणावळा, तर दुसरीकडे पूर्वेला इंदापूर हे तब्बल दोनशे किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे मोटारीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचण्यास काही तास लागतात. त्यामुळे जिल्ह्य़ातील समन्वयाचे व दळणवळणाचे महत्त्वाचे साधन म्हणून नियंत्रण कक्षाकडे पाहिले जाते. त्यामुळे हे नियंत्रण कक्ष अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी पुणे ग्रामीणच्या नियंत्रण कक्षात मोठे बदल केले आहेत. या ठिकाणी अत्याधुनिक अशा व्हेईकल ट्रेसिंग, जीपीआरएस ट्रॅकर, जिल्ह्य़ातील शासकीय वाहनांना जीपीआरएस कीट बसविणे, लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टीम, इंटीग्रेटेड व्हाईस रीन्युअल सिस्टम, आर. एफ. यंत्रणा, एस. एम.एस. सव्र्हर अशा अत्याधुनिक सुविधा नियंत्रण कक्षात बसविल्या आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्षातील अधिकारी प्रत्येक शासकीय वाहन कोठे आहे, त्या वाहनाचा वेग किती हे तेथील टीव्ही स्क्रीनवर पाहून लक्ष ठेवतील. अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी नियंत्रण कक्षातील अधिकारी त्या परिसरातील शासकीय वाहनास त्या ठिकाणी तत्काळ पोहोचण्यास सांगू शकतील.
याबाबत पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले की, एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने चूक केल्यानंतर शिक्षा म्हणून त्याला नियंत्रण कक्षात टाकले जाते. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मात्र, पोलीस नियंत्रण कक्ष हा पोलीस दलाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणाहून जिल्ह्य़ातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. त्यामुळे पुणे ग्रामीणचे नियंत्रण कक्ष अत्याधुनिक करण्यावर भर दिला आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या व्हेईकल ट्रेसिंग आणि जीपीआरएस ट्रॅकर या सुविधेमुळे येत्या एक महिन्यात जिल्ह्य़ातील सर्व वाहनांचे ठिकाण नियंत्रण कक्षात दिसेल. शासकीय वाहने एखाद्या ठिकाणी पाठविल्यानंतर पोहोचल्याशिवाय त्याची काहीच माहिती मिळत नव्हती. मात्र, या सुविधेमुळे पोलीस दलात असलेल्या ६५ वाहनांचे त्या वेळचे ठिकाण दिसेल. त्याच बरोबर एखादे वाहन बराच वेळ एखाद्या ठिकाणी थांबलेले असेल तर ते सुद्धा पोलीस नियंत्रण कक्षात दिसेल. इंटिग्रेटेड व्हाईस सिस्टम (आयव्हीआरएस) या यंत्रणेमुळे पुणे जिल्ह्य़ातून ‘१००’ क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक दूरध्वनीचे संभाषण रेकॉर्ड होणार आहे. संबंधित माहिती पोलीस ठाण्यास तत्काळ तक्रार निवारणासाठी पाठविली जाणार आहे.
सर्व पोलीस ठाण्यांवर
पोलीस अधीक्षकांची ‘नजर’
जिल्ह्य़ातील सर्व पोलीस ठाण्यांवर एकाच ठिकाणी बसून पोलीस अधीक्षक लक्ष ठेवू शकणार आहेत. त्यासाठी जिल्ह्य़ातील ३० पोलीस ठाणी सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निधी मंजूर केला असून, सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम मार्च अखेपर्यंत पूर्ण होईल. प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसविल्यामुळे त्या ठिकाणी काय सुरू आहे, याची माहिती पोलीस अधीक्षक यांना पाहता येणार आहे. त्याच बरोबर ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्येही याचे एक सव्र्हर राहणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांना दिलेल्या ‘पासवर्ड’वरून ते कोणत्याही ठिकाणाहून पोलीस ठाण्यात काय हालचाल सुरु आहे हे पाहता येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लोहिया यांनी दिली.