‘स्थानिक संस्था करा’ तील जाचक तरतुदी रद्द करण्यासाठी बेमुदत बंदमध्ये सहभागी झालेल्या ग्राहक पेठने ग्राहकहिताला प्राधान्य देत बंदमधून माघार घेतली आहे. त्यामुळे ग्राहक पेठ मंगळवारपासून (२१ मे) नियमित वेळेनुसार उघडणार आहे. ग्राहक पेठ तातडीने सुरू करण्याबाबत सहकार खात्याने ग्राहक पेठेला बजावलेल्या नोटिसीची मुदतही सोमवारी संपली.
ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, व्यापारी हा एक ग्राहक आहे या भूमिकेतून ‘एलबीटी’ तील जाचक तरतुदी रद्द करण्यासाठी ग्राहक पेठने पाठिंबा दिला होता. मुख्य सचिवांसमवेत सुरू असलेल्या बैठकीमध्ये बहुतांश मागण्या मान्य होत आहेत. दरम्यानच्या काळात ग्राहक आणि सभासद यांची प्रचंड गैरसोय झाली याची कल्पना आम्हाला आहे. परंतु, एलबीटीच्या प्रश्नामध्ये जनजागृती करून आणि या कायद्यातील त्रुटी दूर करण्याच्या सामाजिक हेतूने या आंदोलनात सक्रिय झालो.
दरम्यान, ग्राहक पेठ म्हणजे ही ग्राहकहिताची चळवळ असलेली ती या आंदोलनात सहभाग घेत ग्राहकांना वेठीस धरत आहे. त्यामुळे २४ तासांत ग्राहक पेठ सुरू न केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा स्वरूपाची नोटीस सहकार खात्याने बजावली होती. त्याची मुदत संपुष्टात आली. त्यामुळे ग्राहक पेठेवर प्रशासक येण्याची शक्यता होती. या पाश्र्वभूमीवर ग्राहक पेठेने बंदमधून माघार घेतली आहे.
ग्राहक पेठ आजपासून सुरू
बेमुदत बंदमध्ये सहभागी झालेल्या ग्राहक पेठने ग्राहकहिताला प्राधान्य देत बंदमधून माघार घेतली आहे.
आणखी वाचा
First published on: 21-05-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grahak peth will service for grahak from today onwards