पुणे : जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अजित पवार यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी १५८ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला. दरम्यान, भाजपकडे १९, काँग्रेस ११, शरद पवार गट पाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेकडे प्रत्येकी चार ग्रामपंचायती आल्याचा कल असून अपक्षांनी २९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे़.
बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे़ दोन ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. आंबेगावात ३० पैकी २५ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचे, तर दोनमध्ये शिवसेना आणि तीन ग्रामपंचायतींवर अपक्षांनी सत्ता मिळविली आहे़ भोरमध्ये २७ पैकी नऊ ग्रामपंचायतींवर अजित पवार गट, तर आठ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने झेंडा फडकवला असून नऊ जागांवर अपक्ष, तर एक जागा रिक्त राहिली आहे़ जुन्नर तालुक्यातील २६ पैकी २० ग्रामपंचायती अजित पवार गटाने ताब्यात घेतल्या आहेत़, तर दोन ग्रामपंचायतींवर भाजप आणि चार ग्रामपंचायतींवर अपक्षांनी विजय मिळविला आहे़ खेड तालुक्यात २५ पैकी २४ ग्रामपंचायतींवर अजित पवार गट, तर एका जागेवर भाजपने विजय मिळविला़.
हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत मराठा-कुणबी नोंदी असलेल्या १२ हजार २९४ व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण
मुळशी तालुक्यात २३ पैकी १२ ठिकाणी अजित पवार गट, तर शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना प्रत्येकी चार ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे, तर तीन ग्रामपंचायतींवर अपक्षांनी वर्चस्व मिळविले़ मावळात १९ पैकी १३ ग्रामपंचायतींवर अजित पवार गट, तर सहा ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे़ पुरंदर तालुक्यात १५ पैकी पाच ठिकाणी अजित पवार गट, तीन ठिकाणी काँग्रेस, दोन शिवसेना, तर पाच ग्रामपंचायतींवर अपक्षांनी वर्चस्व मिळविले़ दौंड तालुक्यात ११ पैकी सहा ठिकाणी अजित पवार गट, चार ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी अपक्ष, शिरूरमध्ये आठपैकी तीन ठिकाणी अजित पवार गट, दोन भाजप, एका ठिकाणी शरद पवार गट, तर दोन अपक्षांकडे आल्या आहेत. इंदापूरात सहा ग्रामपंचायतींपैकी पाच ठिकाणी अजित पवार गट, एका ठिकाणी भाजप, वेल्हा तालुक्यात सहापैकी चार ग्रामपंचायतींवर अजित पवार गट, तर एक ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी अपक्षांनी विजय मिळविला आहे़ हवेलीत तीनपैकी दोन ठिकाणी अजित पवार गट, तर एका ठिकाणी अपक्षांनी विजय मिळविला़.
हेही वाचा >>>अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देऊन तरुणाकडे २० लाखांची खंडणी; महिलेविरुद्ध गुन्हा
बारामतीत भाजपचा चंचुप्रवेश
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे बारामती तालुक्याकडे लागून राहिले होते. याठिकाणी सर्वाधिक ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल ३० ठिकाणी अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे़ मात्र, दोन ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवत बारामती तालुक्यात चंचुप्रवेश केला आहे.
दिग्गजांनी सिद्ध केले वर्चस्व
खेड आणि आंबेगाव तालुक्यात दिलीप मोहिते- पाटील आणि दिलीप वळसे- पाटील यांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे़ मावळमध्ये सुनील शेळके, इंदापूरमध्ये माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, दौंडमध्ये रमेश थोरात यांचे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वर्चस्व राहिले आहे़.