पुणे : जिल्हा परिषदेच्या नोकर भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत मावळ तालुक्यातील एका ग्रमापंचायत कर्मचाऱ्याने जिल्हा परिषदेच्या आवारात नोटांची उधळण करत आंदोलन केले. मात्र पूर्व परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रापंचायतीमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरल्या जातात. भरतीमध्ये अन्याय झाल्याचा सिरसाट यांचा आरोप आहे.
तीन वर्ष न्याय मागतोय, एकाही अधिकाऱ्याने न्याय दिला नाही. अधिकारी मुजोर आहेत, हे मिनी मंत्रालय नाही तर, मनी मंत्रालय आहे, अशा घोषणा देत म्हणत सिरसाट यांनी गळ्यातील पैशांच्या नोटा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ उधळल्या. नोटा उधळल्यानंतर तिथेचे थांबले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सन २०२१-२२ साली दहा टक्क्यांची नोकर भरती झाली होती. त्या भरतीमध्ये अन्याय झाल्याचा दावा सिरसाट यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले होते. सध्या भरती सुरू आहे. त्यामध्ये नियम डावलून नोकरी भरती करता येत नाही. मात्र अपात्र असूनही नियुक्ती मिळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांत तीन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. त्यातच पुन्हा एकदा नोटा उधळल्या असल्याची चर्चा दिवसभर जिल्हा परिषदेत रंगली होती.