गोड रसाळ द्राक्षांचा हंगाम सुरूव्हायला अद्याप महिनाभर आहे. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. यंदाच्या वर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी महिन्याभर आधी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत घाऊक बाजारात अडीच टन द्राक्षांची आवक झाली आहे.
द्राक्षांचा हंगाम डिसेंबर ते मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत सुरू असतो. गेल्या काही वर्षांपासून हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. गेल्या दोन दिवसांत इंदापूर, बारामती भागातून द्राक्षांची आवक सुरू झाली आहे.
सध्या आवक तुरळक असली तरी येत्या काही दिवसांत आवक आणखी वाढेल. शरद सीडलेस (काळी द्राक्षे) या जातीच्या चार किलो द्राक्षांना प्रतवारीनुसार चारशे ते पाचशे रुपये तसेच तासेगणेश (पिवळसर द्राक्षे) या जातीच्या आठ किलो द्राक्षांना प्रतवारीनुसार आठशे ते एक हजार रुपये भाव मिळाला आहे, अशी माहिती फळ बाजारातील व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
डिसेंबर महिन्यात द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. सध्या बाजारात सुरू असलेली आवक हंगामपूर्व असली तरी प्रतवारी चांगली आहे. गतवर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात द्राक्षांना वीस ते तीस टक्के जादा भाव मिळाला आहे. पुणे शहर, पिंपरी तसेच जिल्हय़ातील किरकोळ विक्रेत्यांकडून द्राक्षांना मागणी आहे.
कोकण भाग आणि पर्यटनस्थळांवरून द्राक्षांना मागणी वाढत आहे. सध्या बारामती, इंदापूर भागातील द्राक्षे बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. हंगाम सुरू झाल्यानंतर सातारा जिल्हय़ातील फलटण, सोलापूर आणि सांगली जिल्हय़ातून द्राक्षांची आवक सुरू होईल, असे मोरे यांनी सांगितले.