पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेला दोन कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कामगिरी आहे. २१ लाखांचे ४८ तोळे सोन्याचे दागिने, २५ लाखांच्या दोन महागड्या चारचाकी, ८ लाखांच्या २२ दुचाकी, १४ लाख ८८ हजारांचे ६९ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण दोन कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे.
हेही वाचा – पिंपरी चिंचवडकरांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधांसाठी आता कृती आराखडा
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरी गेलेले मोबाईल, दुचाकी, चारचाकी, सोन्याचे दागिने, लॅपटॉप हे मूळ मालकांना परत केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते मूळ मालकांना मुद्देमाल देण्यात आला. यावेळी पोलीस मुख्यालय निगडी येथे हा कार्यक्रम पार पडला. ‘महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे’चे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. मूळ मालकांना मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते.