पुणे : कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करण्याचा देशातील पहिला प्रकल्प महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. रामटेकडी येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची क्षमता ३५० मेट्रीक टन एवढी असेल, अशी माहिती आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
केंद्र आणि राज्य शासनाकडून इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजन निर्मितीचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात रामटेकडी येथे दैनंदिन १० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून ०.६ टन हायड्रोजन निर्मिती केली जाणार आहे. हायड्रोजन निर्मितीचा पहिल्या टप्प्यातील प्रकल्प उभारणी प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर ३५० टनचा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.
हेही वाचा >>>पिंपरी: हिंजवडीत ७९ वर्षीय पतीकडून ७५ वर्षांच्या महिलेचा खून
रामटेकडी येथील प्रकल्पात निर्माण होणारा हायड्रोजन इंधनासाठी पीएमपीला देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आर्थिक भार महापालिकेवर पडणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पामुळे पीएमपीच्या इंधनाची किती बचत होईल, खर्च किती कमी होईल, याची माहिती संकलित केली जाणार आहे.
याशिवाय ‘वेस्ट टू एनर्जी’ ३०० मेट्रीक टन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील देखभाल दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षात हा प्रकल्प ७५० मेट्रीक टन क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे. तसेच समाविष्ट २३ गावांमधील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात विविध कामे करण्यासाठी अस्तित्वातील जागा ताब्यात घेण्यात येणार असून तेथे कचरा हस्तांतरण केंद्र, कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. तर देवाची उरळी कचरा भूमीतील जागेत कार्यरत असलेल्या ३५० मेट्रीक टन क्षमतेच्या प्रकल्पाची ५०० मेट्रीक टनापर्यंत क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे.