पुणे : परराज्यातून होणारी मटारची आवक वाढली आहे. त्यामुळे मटार स्वस्त झाला असून, किरकोळ बाजारात एक किलो मटारचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत इतके आहेत. ‘मध्य प्रदेशात मटारची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. भोगी, संक्रांतीनंतर मटारच्या मागणीत घट झाली. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या दररोज साधारणपणे १२ ते १४ ट्रक मटारची आवक होत आहे. दर रविवारी मटारची आवक दुप्पट होते. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात एक किलो मटारचे दर ५० रुपये होते.
परराज्यातून होणारी मटारची आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली आहे. सध्या घाऊक बाजारात एक किलो मटारची विक्री २५ ते ३० रुपये दराने केली जात आहे. किरकोळ बाजारात एक किलो मटारचे दर प्रतवारीनुसार ४० ते ५० रुपयांपर्यंत आहेत. मटार स्वस्त झाल्याने गृहिणींकडून मागणी वाढली आहे,’ असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.
येत्या काही दिवसांत राजस्थानातील मटारचा हंगाम सुरू होणार आहे. मध्य प्रदेशासह राजस्थानातून मटारची आवक वाढल्यानंतर दरात आणखी घट होईल. मटार स्वस्त झाल्याने प्रक्रिया उद्योगांकडून खरेदी केली जाते. वर्षभर मटार शीतगृहात साठवून त्याची विक्री केली जाते, असे त्यांनी नमूद केले.
पुरंदर, वाईतील मटार लागवडीत घट ‘पुरंदर, वाई भागातील मटार परराज्यातील मटारच्या तुलनेत गोड असतो. गेल्या काही वर्षांपासून पुरंदर, वाई भागातील मटार लागवडीत घट झाली आहे. पुरंदरमधील मटारला ग्राहकांकडून चांगली मागणी असते. पुरंदर, वाई भागतील मटारचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. मार्च महिन्यात पुरंदरमधील मटारचा हंगाम सुरू होतो,’ असे मार्केट यार्डातील अडते अमोल घुले यांनी सांगितले.