पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने (स्टेट लेव्हल टेक्निकल ॲडव्हायजरी कमिटी ) हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार झाला आहे.
या प्रकल्पांतर्गत खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान २८ किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक जलसंपदा विभागाकडून तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला होता. या समितीने मध्यंतरी त्या अहवालात किरकोळ त्रुटी काढल्या होत्या. त्या दुरुस्त करून दिल्यानंतर समितीने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे हा अहवाल अंतिम मान्यतेसाठी आता राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे २.८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. तसेच पाणी गळती कमी होऊन शेतीलादेखील पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा – पिंपरी : कापड दुकानदाराला खंडणी मागत दुकानासह जाळून टाकण्याची धमकी देणारा गजाअड
खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. राज्य सरकारकडे प्रशासकीय मान्यतेसाठी तो जाणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे जलसंपदा पुणे विभाग, मुख्य अभियंता, ह.वि. गुणाले म्हणाले.
हेही वाचा – सिंहगड रस्ता परिसरात कोयता गँगची दहशत; अल्पवयीन मुलांसह तिघांवर वार
असा असणार आहे बोगदा
७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा इंग्रजी ‘डी’ आकराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे प्रस्तावित आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार असून ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.