औद्योगिक मंदीमुळे टाटा मोटर्सला बसत असलेली झळ व कंपनीची सध्याची अवस्था पाहता एलबीटी तसेच अन्य करांमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी कामगार संघटनेने केल्यानंतर आयुक्त राजीव जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून चांगला पर्याय देऊ, असे आश्वासन दिले आहे.
एलबीटीमध्ये सवलत देण्याच्या मागणीवरील चर्चेसाठी आयुक्त, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, कामगार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी यासाठी पुढाकार घेतला. एलबीटीचे प्रमुख यशवंत माने, टाटा मोटर्सचे संगमनाथ डीग्गे, व्ही. सुरेश, बाबुसाहेब पिंगळे, युनियनचे विष्णुपंत नेवाळे, सतीश ढमाले, सुरेश जामले, नामदेव ढाके, सचिन लांडगे, यशवंत चव्हाण, उमेश म्हस्के आदी उपस्थित होते. याबाबतची माहिती कामगार प्रतिनिधींनी पत्रकारांना दिली.
टाटा मोटर्सच्या पिंपरी विभागात उत्पादन होणाऱ्या वाहनांसाठी तुलनेत जास्त खर्च येतो. त्यामुळे येथील उत्पादन कमी होत आहे. एलबीटी हे त्याचे प्रमुख कारण असल्याने त्यात सवलत मिळाल्यास कंपनीला फायदा होईल. शहरात टाटा मोटर्सचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वर्षांकाठी जवळपास २५० कोटींचे उत्पन्न कंपनीकडून पालिकेला प्राप्त होते. मात्र, कंपनीची सध्याची अवस्था फारशी चांगली नसल्याने महापालिकेने मदतीचा हात द्यावा. भविष्यात कंपनीचे स्थलांतर झाल्यास अनेकांवर बेरोजगारीची कु ऱ्हाड कोसळेल. कंपनीत नव्या मोटारींचे उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे त्यासाठी पालिकेने सहकार्य करावे, अशी विनंती कंपनीकडून  करण्यात आल्यानंतर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green signal tata motors pcmc commissioner
Show comments