पुणे : मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्टला होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी वरिष्ठ पातळीवर नियोजनाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.
सध्या मेट्रोची सेवा दोन मार्गांवर सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे एकूण १२ किलोमीटरचे दोन मार्ग ६ मार्च २०२२ रोजी प्रवाशांसाठी सुरू झाले. त्यानंतर फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या एकूण १३ किलोमीटरच्या विस्तारित मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. विस्तारित मार्गांवर मेट्रोची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक विकासकामांचे उद्घाटन केले जाणार असून, त्यात मेट्रोचाही समावेश आहे.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडकरांची पायपीट थांबणार; गावांचा भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत समावेश होणार
विस्तारित मार्गांची पाहणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आली. आधी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तीन वेळा विस्तारित मार्गांची तपासणी केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी अंतिम पाहणी करुन मंजुरी दिली आहे. आयुक्तांनी मंजुरी दिल्याने या विस्तारित मार्गांवरील सेवा करण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.
जमिनीच्या १०८ फूट खाली साकारले मेट्रो स्थानक
जिल्हा न्यायालय हे मेट्रो स्थानक जमिनीच्या १०८ फूट खाली साकारले असून, हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट (१७ किमी) आणि वनाझ ते रामवाडी (१६ किमी) या दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका या स्थानकात एकमेकांना छेदतात. या स्थानकामधे पिंपरी महापालिका ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना स्वयंचलित जिना आणि लिफ्ट यांनी जोडण्यात आले आहे.
नागरिकांना तिकिटात सवलत
मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर ११ मेट्रो चालविल्या जाणार आहेत तर दोन मेट्रो राखीव असणार आहेत. याचबरोबर शनिवारी आणि रविवारी नागरिकांना मेट्रो सफर करता यावी, यासाठी तिकिटात ३० टक्के सवलत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनाही मेट्रो प्रवासात सवलत दिली जाणार आहे.
मेट्रोचे विस्तारित मार्ग
१. गरवारे महाविद्यालय- रुबी हॉल स्थानक
अंतर – ५.१२ किलोमीटर
स्थानके – गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल
२. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय
अंतर – ८ किलोमीटर स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय