येरवडा भागात किरकोळ वादातून टोळक्याने किराणा माल दुकानाची तोडफोड आणि किराणा माल विक्रेत्या दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. इलियास शेख (वय ४५), सलमा शेख (वय ४८), फारुख शेख (वय २२), नदीम शेख (वय २०), अमिन शेख (वय १९, सर्व रा. येरवडा ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अक्षय शिंदे (वय ३४, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या; पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे यांचे येरवड्यातील सिद्धार्थनगर भागात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. अक्षयच्या घराशेजारी राहणारा मजहर दुकानासमोरुन मद्याची बाटली घेऊन निघाला होता. त्या वेळी इलियासने मजहरला मारहाण केली. दुकानासमारे भांडणे करु नका, असे अक्षयने त्यांना सांगितले. त्यानंतर इलियासने त्याच्या नातेवाईकांना बोलावून अक्षय आणि त्याच्या पत्नीला तलवारीचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच दुकानातील मालाची तोडफोड केली. पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव अधिक तपास करत आहेत.