समाजाच्या व्हॉट्सअॅपग्रुपवरून विवाह जुळवल्यानंतर लग्न ठरलेल्या दिवशी नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय आलेच नसल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. यामुळं सुखी संसाराची स्वप्न पाहिलेल्या नववधूची निराशा झाली आहे. हा प्रकार घडल्यानंतर नववधूच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

झालं अस की, आयटी कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीचा विवाह ठरला होता. एका मध्यस्थ व्यक्तीने समाजातील व्हाट्सअॅप ग्रुपवरून मुलाचं स्थळ आणलं होतं. याच वर्षी एप्रिल महिन्यात मुलाकडील कुटुंबीय मुलीच्या घरी आले, त्यांनी घर पाहिलं, मुलगीही पसंत पडली. त्यांच्यात इतर बोलणंही झालं, मुलीकडील मंडळींनी मुलाचं घर पाहिलं. दोघांचा विवाह ठरला, एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला. त्यानंतर १४ मे २०२२ ही लग्नाची तारीख काढण्यात आली.

दरम्यान नवरदेव मुलानं प्री-वेडिंग शूटबाबत होणाऱ्या पत्नीला विचारलं. पण आमचं एवढं बजेट नाही, असं म्हणत मुलीने प्री-वेडिंग शूट करण्यास नकार दिला. तसेच लग्नातील घोड्यावरूनही त्यांच्यात कुरबूर झाली होती. मुलगा आणि मुलगी दोघं एकमेकांना भेटले. तेव्हा, मुलाने मुलीला अनेक आर्थिक गणिताचे प्रश्न केले असं तक्रारीत म्हटलं आहे. मे महिन्याच्या ११ तारखेला मुलीने मुलाला फोन केला तो बंद लागला. कुटुंबातील इतर सदस्यांना फोन केला त्यांचे फोनही बंद लागले.

त्यामुळे मुलीकडील कुटुंबाने नवरदेवाच्या घरी जाऊन शहानिशा केली. पण त्यांच्या घराला कुलूप होतं. ते लग्न कार्याच्या खरेदीसाठी बाहेर गेली असतील, असं समजून ते घरी परतले. असेच तीन दिवस सुरू राहीलं. अखेर १४ मे रोजी लग्नाची तारीख आली. शहरातील नावाजलेल्या मंगल कार्यलयात विवाह पार पडणार होता. त्याठिकाणी नववधू, कुटुंबीय, पै- पाहुणे सर्वजण आले होते. दुपारी साडे बाराचा मुहूर्त होता, तो टळून गेला. मात्र, नवरामुलगा आणि त्याचं कुटुंबीय आलेच नाहीत. नववधूच्या वडिलांनी नवरामुलगा आणि कुटुंबीयांना फोन लावला. मात्र तो बंद लागला. सायंकाळी सहापर्यंत सर्वांची वाट पाहिल्यानंतर अखेर नववधूच्या कुटुंबीयांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.