सणस मैदानासमोर उभारल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात यावे, असा निर्णय महापालिका पक्षनेत्यांचा बैठकीत शुक्रवारी एकमताने घेण्यात आला.
बाजीराव रस्त्यावर सणस मैदानासमोरील मोकळ्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन उभे करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने या स्मारकाला एकमताने मान्यता दिली असून स्मारकाचे भूमिपूजन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५७ मध्ये दहा गुंठे जागेवर ही वास्तू उभी केली जाणार आहे. त्यासाठी आठ हजार ६०० चौरसफुटांचे बांधकाम केले जाईल. या कामाची एक कोटी ८५ लाखांची निविदाही मंजूर करण्यात आली आहे.
ही वास्तू दोन मजली असेल आणि त्यात दोन कलादालनेही असतील. एका कलादालनात बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक व्यंगचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, तर दुसऱ्या कलादालनात व्यंगचित्रकारांच्या चित्रांची प्रदर्शने नियमितपणे भरवण्याचे नियोजन आहे. याच वास्तूत छोटे प्रेक्षागृह देखील बांधले जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा