पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या समूह विद्यापीठाच्या योजनेला राज्यभरातून थंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यभरातून केवळ दोनच संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांनी समूह विद्यापीठ स्थापनेसाठी पुढाकार घेतल्याचे अद्याप दिसून येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये ‘समूह विद्यापीठ’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. तसेच ‘विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये’ ही संकल्पना मोडीत काढून २०३५ पर्यंत सर्व शिक्षणसंस्था या पदवी प्रदान करणाऱ्या संस्था, म्हणजेच विद्यापीठे व्हावीत असे उद्दिष्ट आहे. सध्या विद्यापीठांना संलग्नित महाविद्यालयांचे नियमन करावे लागते. समूह विद्यापीठांमुळे शासकीय विद्यापीठांवरील महाविद्यालयांचा भार कमी होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने समूह विद्यापीठांची कल्पना पुढे आली. सध्या राज्यात तीन समूह विद्यापीठे अस्तित्वात आहेत. समूह विद्यापीठ धोरणाअंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना तयार केल्या. त्यानुसार आरोग्य आणि कृषी वगळता इतर सर्व पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये समूह विद्यापीठात समाविष्ट होऊ शकतात.

हेही वाचा…पत्नीला मारहाण प्रकरणात अटक टाळण्यासाठी १२ वर्षे पसार; गुजरातमध्ये नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या एकास अटक

पाचपेक्षा जास्त महाविद्यालये किंवा संस्था समूह विद्यापीठात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाकडून मूल्यांकन केले जाईल. समूह विद्यापीठातील प्रमुख महाविद्यालय वीस वर्षे कार्यरत, या महाविद्यालयात किमान दोन हजार विद्यार्थी, सहभागी महाविद्यालयांमघ्ये किमान चार हजार विद्यार्थी, महाविद्यालयांकडे एकत्रित १५ हजार चौरस मीटर बांधकाम असावे, प्रमुख महाविद्यालय पाच वर्षांपासून स्वायत्त असावे किंवा किमान ३.२५ सीजीपीए मानांकन, पहिली पाच वर्ष महाराष्ट्र सरकारकडून या विद्यापीठांना प्रतिवर्ष एक कोटी रुपये अनुदान, अशा मार्गदर्शक सूचनांचा त्यात समावेश आहे.

समूह विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचना जवळपास वर्षभरापूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतर समूह विद्यापीठासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. राज्यभरात अनेक जुन्या, नामांकित शिक्षण संस्था असल्याने समूह विद्यापीठ योजनेला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आतापर्यंत राज्यभरातून दोनच प्रस्ताव शासन दरबारी सादर झाले आहेत. त्यात एक प्रस्ताव मुंबईतील संस्थेचा, तर दुसरा कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थेचा समावेश आहे. त्यामुळे सध्यातरी राज्यातील नामांकित शिक्षण संस्था समूह विद्यापीठ स्थापनेसाठी रस घेत असल्याचे दिसून येत नाही.

हेही वाचा…“पराभव दिसत असल्याने श्रीरंग बारणेंकडून रडीचा डाव”, नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तींनी उमेदवारी दिल्याने संजय वाघेरेंची टीका

समूह विद्यापीठ योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन प्रस्ताव सादर झाले आहेत. मात्र आणखी पाच प्रस्ताव सादर होण्याची कार्यवाही संस्थास्तरावर सुरू आहे. प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया मोठी आहे. समूह विद्यापीठ योजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी संस्थाचालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे येत्या काळात समूह विद्यापीठांसाठीचे प्रस्ताव वाढतील. – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण संचालक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Group university scheme receives low response in maharashtra only two proposals submitted statewide pune print news ccp 14 psg