पुणे : बनावट कंपनीच्या नावे कागदपत्रे सादर करून ५६१ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर चुकविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पुणे कार्यालयाने कारवाई केली असून, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी मोहम्मद रियाजउद्दीन (रा. हैदराबाद, तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याचे साथीदार अब्दुल सलाम उर्फ सलामभाई, नैशाब मलिक नौशादभाई, सलमान मलिक, शादाबभाई, तन्वीर, ओएसिस, राजू यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जीएसटी पुणे कार्यालयातील अधिकारी रवी भूषणप्रसादसिंग कुमार (वय ३४) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मोहम्मद रियाजउद्दीनला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करणे, फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा…जे निष्ठावंत आहेत आणि जे उमेदवार जिंकतील आशांना उमेदवारी दिली जाईल : प्रशांत जगताप

जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात एन. एल. ट्रेडर्स या खात्याची ऑनलाईन तपासणी केली. तेव्हा काही व्यवहार संशयास्पद आढळून आले. त्यानंतर जीएसटी कार्यालयातील पथकाने चौकशी सुरु केली. नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात एका भंगार साहित्य खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे चौकशी केली. त्यांच्याकडे जीएसटी कर भरणा पावत्यांबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा हैद्राबाद येथील एस. बी. ट्रेडींग कंपनीचे सलीम भाई यांनी पावत्या दिल्याची माहिती त्याने दिली. कर पावत्यांबाबत संशय आल्याने याबाबतची माहिती हैद्राबाद येथील जीएसटी कार्यालयाला कळविण्यात आली. हैद्राबाद येथील पथकाने चौकशी केली. तेव्हा अशा प्रकारची कंपनी तेथे अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. तांत्रिक तपासणीत मोहम्मद रियाजउद्दीन याने जीेसटी करपावती तयार केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून दोन लॅपटाॅप, चार मोबाइल संच, पेनड्राइव्ह, तसेच बनावट पावत्या जप्त करण्यात आल्या.

हे ही वाचा…पुणे: नवी पेठेतील अभ्यासिकेत आग

चौकशीत ५८ कंपन्यांच्या नावे बनावट कर पावत्या

आरोपी रियाजउद्दीनला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने ५८ कंपन्यांसाठी कर भरणा पावत्या तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी अब्दुल सलाम उर्फ सलामभाई, नैशाब मलिक नौशादभाई, सलमान मलिक, शादाबभाई, तन्वीर, ओएसिस, राजू यादव यांची नावे निष्पन्न झाले. करचुकवेगिरी, तसेच कर भरण्याबाबतच्या बनावट पावत्या तयार करण्यासाठी आरोपींनी पैसे दिल्याची माहिती रिजाजउद्दीने जीएसटी पथकाला दिली. रिजाजउद्दीनला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. आरोपी यादवकडे बनावट पावत्यांद्वारे कर भरल्याचे भासवून फसवणूक करण्याचे काम सोपविण्यात आले होते. २०२१ पासून आरोपींनी बनावट कर भरणा पावत्या तयार करून ५६१ काेटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst tax of rs 561 crore has evaded by submitting documents in name of fake company pune print news rbk 25 sud 02