पुणेकर की सांगलीकर या विषयावरून पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीतच शाब्दिक जुगलबंदी रंगली. मात्र, पुढील कार्यक्रमासाठी जायचे असल्याने भाषण करून बापट निघून गेल्यावर पतंगराव यांनी त्यांच्या वक्तव्याला उत्तर दिले. बापट असते तर आणखी दणक्यात उत्तर दिले असते असे पतंगरावांनी सांगितले.
विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते शरद पवार यांना विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी गिरीश बापट, डॉ. पतंगराव कदम, उल्हास पवार, शरद रणपिसे, वंदना चव्हाण, प्रशांत जगताप, मुकारी अलगुडे, सतीश मगर, अंकुश काकडे व्यासपीठावर होते.
व्यासपीठावर मान्यवरांचा नामोल्लेख करीत पतंगराव कदम यांचे नाव घेताना गिरीश बापट म्हणाले, पतंगराव, तुम्ही पुणेकर की सांगलीकर हे आधी स्पष्ट करा. मुलाचा प्रश्न आला की तुम्ही पुणेकर आणि एरवी सांगलीकर असता. ‘त्यावर मी पुणेकरच आहे’, असे पतंगरावांनी जाहीर केले. पण, ‘रेशन कार्ड तर सांगलीचेच आहे ना’ अशी टिप्पणी करीत बापट यांनी ‘एकदाचा पुणेकर हा स्टॅम्प लावून घ्या’, अशी सूचना पतंगरावांना केली.
मी १९६१ ला पुण्यात आलो. पण, तुम्ही निवडून देणार का याची खात्री नसल्यामुळे सांगलीला गेलो, अशी सुरुवात करून पतंगराव कदम यांनी ‘राहुलने निर्णय घेतला म्हणून विश्वजित उभा राहिला. तर, हा सांगलीकर आहे असे हेच सगळीकडे सांगत फिरायचे’, असे स्पष्ट केले. खरा पुणेकर कोण आहे? टिळक, धारिया, कलमाडी हे काय पुणेकर आहेत का, असे प्रश्न पतंगरावांनी उपस्थित केले. बापट असते तर आणखी दणक्यात उत्तर दिले असते, अशी पुस्तीही पतंगरावांनी जोडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा