पुण्यात तालमीत असताना आयुष्यातील पहिले मतदान गिरीश बापट यांना केले, ते ‘वस्ताद’, मी त्यांचा ‘पठ्ठा’ आहे. अपक्ष आमदार असूनही मतदारसंघातील इतकी कामे मार्गी लागतील, असे वाटले नव्हते. सकारात्मक दृष्टिकोनातून सरकारने महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांमुळे हे शक्य झाल्याचे सांगत मला आणखी ताकद द्या, अशा भावना भोसरीचे ‘अपक्ष’ आमदार महेश लांडगे यांनी मोशीत व्यक्त केल्या. पुणे-नाशिक रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक घेण्याची मागणी लांडगे यांनी केल्यानंतर १५ दिवसात बैठक घेण्याची घोषणा बापट यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक व अपक्ष आमदार असलेले लांडगे यांची भविष्यातील राजकीय वाटचाल गुलदस्त्यात आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या संपर्कात असून सर्वाना खेळवण्याचे काम ते करत आहेत. मोशीतील बाजार समितीच्या कार्यक्रमात लांडगे यांनी, मुख्यमंत्री व बापट यांच्या कार्यपध्दतीवर कौतुकाचा वर्षांव केला. मुख्यमंत्र्यांनी ‘बफर झोन’ची हद्द कमी केल्याने १६०० कुटुंबांना न्याय मिळाला. अनधिकृत बांधकामप्रकरणी दिलासा दिला. बाजार समितीच्या चुकीच्या नोटिसा मागे घेतल्या. मतदारसंघातील अनेक प्रश्न वर्षभरात मार्गी लावले. मुख्यमंत्री, पालकमंत्री सकारात्मक आहेत. अजूनही अडचणी आहेत, त्यासाठी ताकद द्या. पुणे-नाशिक महामार्गाची शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर रहदारी वाढली, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे, अनेकांच्या जिवाशी खेळ होतो आहे. हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी पिंपरी पालिका सक्षम आहे. मात्र, श्रेयासाठी काहीजण आडकाठी घालतात, याचा निर्णय जलद घ्यावा. औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामात लक्ष घालावे, मुख्यमंत्र्यांसमवेत पुन्हा बैठक घ्यावी, अशी मागणी लांडगे यांनी केली. या कौतुकाची परतफेड बापट यांनी लगेचच केली. महेश लांडगे कुठे भेटेल तेथे पोटतिडकीने प्रश्न मांडतात, सातत्याने पाठपुरावा करतात, ते वैयक्तिक कामे सांगत नाहीत, लोकांसाठी झटतात. नाशिक रस्त्यासाठी गडकरींसमवेत बैठक घेऊ, ते काम पिंपरी पालिकेकडून करून घेऊ व त्याची सुरुवात लांडगे यांच्याच हस्ते करू, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा