प्रथमेश गोडबोले
पुणे : ससूनच्या प्रवेशद्वारावर सापडलेले अमली पदार्थ आणि अमली पदार्थांचा तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. गैरप्रकारांना कोण जबाबदार आहे, असे विचारत ससून प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता निर्णय घेण्याची वेळ आल्याचा गर्भित इशारा पवार यांनी या वेळी दिला.
ससून रुग्णालयातील अमली पदार्थांच्या प्रकरणानंतर रुग्णालयातील अनेक प्रकरणे समोर आली. रुग्णालयातील कैद्यांच्या कक्षात अनेक कैदी महिनोंमहिने पाहुणचार घेत असल्याचेही यानिमित्ताने समोर आले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांनी पुण्यात येऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यामध्ये शहरासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचाही आढावा घेतला. या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-भिडे पूल परिसरात पुढील दोन महिने वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग
या बैठकीसाठी नियोजनात सकाळी ११ ते १२ अशी वेळ देण्यात आली होती. या एका तासात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात येणार होता. पालकमंत्री पवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला ससूनचे अधिष्टाता डॉ. ठाकूर यांच्याकडे मोर्चा वळवला. पुढील २५ मिनिटे पवार यांनी ससून प्रशासनाला धारेवर धरले. ससूनमध्ये घडलेल्या घटनेला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर डॉ. ठाकूर यांनी थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यावर पवार यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर पवारांनी वृतपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचून दाखविल्या. तसेच आता निर्णय घेण्याची वेळ आल्याचा इशाराही या वेळी दिला.
आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष झाल्यास कारवाई
आरोग्य सुविधांसाठी राज्यस्तरावरून अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी औषधाची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. येत्या मार्चअखेरपर्यंत दोन्ही महापालिका क्षेत्रात खाटांची संख्या वाढवावी. ससून रुग्णालयात अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा सर्वसामान्य रुग्णाला लाभ झालाच पाहिजे. यात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
आणखी वाचा-मुंबई ‘एनसीबी’चे पुणे जिल्ह्यात छापे; जुन्नर, शिरूर परिसरातून २०० किलो ‘अल्प्राझोलम’ जप्त
अधिष्ठातांनी पळ काढला
वाढत्या रुग्णसंख्येला आवश्यक उपचार, औषधे पुरेशी आहेत का, अवघड शस्त्रक्रिया शासकीय सुविधा, मनुष्यबळ याबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला, बैठकीनंतर एवढीच माहिती पत्रकारांना देऊन ससूनचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी अधिक बोलण्यास नकार देत गाडीत बसून पळ काढला.