पुणे शहरातील ४०० किलोमीटर रस्त्यांची नव्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. या रस्त्यांवरील केवळ खड्डे बुजविले जाणार नसून डांबराचा एक थर देण्यात येणार आहे. अद्याप पाऊस थांबलेला नसल्याने या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करावी आणि पाऊस थांबल्यानंतर तातडीने कामे सुरू करण्याचे आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांना दिले.

हेही वाचा >>>पुणे : डांबरीकरण डिसेंबरमध्ये ? ; पहिल्या टप्प्यात ६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की यंदा शहर व परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परिणामी शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांना अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डीपीसीच्या बैठकीत आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केले असून त्याला मान्यताही दिली आहे. त्यानुसार शहरातील ४०० कि.मीचे रस्ते नव्याने दुरुस्त करण्यात येणार आहेत. १० ते १५ नोव्हेंबरच्या सुमारास ही कामे प्रत्यक्षात सुरू होतील.

हेही वाचा >>>पुणे : सदोष देयके मिळालेल्या ९७ हजार मिळकतींचे फेरसर्वेक्षण

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने पुण्याला झोडपले असून पाऊस पडल्यानंतर शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांना रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्याची क्षमता व्यवस्था तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोथरूड विधानसभा मतदार संघात कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) गटारींच्या झाकणांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यानुसार शहरातील इतर विधानसभा मतदार संघातही अशाप्रकारे विकासकामे करण्याबाबत चाचपणी केली जाणार आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>३९० महाविद्यालयांनी सुधारणा न केल्यास कारवाई ; पुणे विद्यापीठाची तंबी

मेट्रो प्रशासनाला सुनावले
शहरातील ज्या रस्त्यांवर मेट्रोची कामे सुरू आहेत. त्या ठिकाणचे रस्ते दुरुस्त करणे ही मेट्रो प्रशासनाची जबाबदारी आहे. या रस्त्यांची दुरुस्ती महामेट्रोने करावी किंवा महापालिका रस्ते दुरुस्त करेल त्यांना मेट्रोने निधी द्यावा, अशा स्वरूपाची नोटिस महामेट्रोला बजावण्यात आली आहे.
राज्य सरकार निधी देईल

एल ॲण्ड टी कंपनीकडून शहरातील नाले खोलीकरण आणि रुंदीकरण तसेच नाल्यांमधून येणारे अतिरिक्त पाणी नागरी वस्त्यांमध्ये जाऊ नये म्हणून नाल्यांभोवती सीमाभिंती उभारण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. एल ॲण्ड टी कंपनीने शहरात विविध ठिकाणी पूल, भुयारी मार्ग, अस्तित्वातील रस्त्यांची दुरुस्ती सुचवली असून त्याकरिताही राज्य सरकार निधी देईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

Story img Loader