दिवाळीनिमित्त दरवर्षी केवळ कसबा विधानसभा मतदार संघापुरता ‘मर्यादित’ असलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी पक्षाच्या माध्यमातून ‘व्यापक’ स्वरूप दिल्यामुळे या दिवाळी फराळाची खमंग चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली. शहर पातळीवर दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नक्की कारण काय, याबाबतही तर्क-वितर्क लढविण्यास सुरुवात झाली.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने कसबा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यासाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप बापट यांच्याकडून देण्यात आले. हा कार्यक्रम बापट यांचा असला तरी पक्षाच्या माध्यमातून शहरातील अनेक संस्था, अन्य पक्षातील मित्रमंडळी यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे शहर पातळीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यावरून शहराच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली.

गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी बापट हे खासदारपदासाठी इच्छुक होते. उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही केले होते. मात्र पक्षाकडून खासदार अनिल शिरोळे यांना संधी देण्यात आली. कसबा विधानसभा मतदार संघातून ते पाच वेळा विजयी झाले असले तरी खासदार म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच कसबा विधानसभा मतदार संघापुरता मर्यादित असलेल्या या कार्यक्रमाला शहर पातळीवरील कार्यक्रमाचे स्वरुप देण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, पक्षाचे अध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृहनेता श्रीनाथ भिमाले हे उपस्थित राहिले असले तरी खासदार अनिल शिरोळे आणि सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यासह पक्षाचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली.

Story img Loader