पुण्यातील शिवाजीनगर भागातील साखर संकुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य मंडळी देखील उपस्थित होते. त्या बैठकीनंतर राज्यातील अनेक घडामोडींबाबत रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात कोयता गँगच्या घटना वाढल्या आहेत. त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, राज्यात शांतता राहिली पाहिजे. यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. राज्यात सद्य:स्थितीला मुली, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुंडागर्दी देखील वाढली आहे. रस्त्यावर मुलींना मारले जात आहे. तर पुण्यात कोयता गँगचे प्रमाण वाढलं असून गुंडांनी धुडगूस घातला आहे. त्यावर पोलीस आयुक्तांचा वचक राहिला नाही. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्याकडे पालकमंत्री (अजित पवार) यांचे लक्ष नसल्याचे सांगत अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांनी टोला लगावला.
हेही वाचा – काय सांगता! जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून चक्क पुरुषांनी वटवृक्षाला मारले सात फेरे
हेही वाचा – पुणे : अपघातानंतर वाहतूक पोलिसांना जाग; गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांना बंदी
राज्यातील शेतकरी वर्गापासून सर्व सामान्य नागरिकाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्या सर्व गोष्टींना महायुती सरकार जबाबदार आहे. त्या विरोधात आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.