लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : उत्साह, आनंद नवलाई घेऊन येणारा मराठी नववर्षारंभदिन आणि साडेतीन मुहुर्तींपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला रविवारी (३० मार्च) सूर्योदयानंतर सकाळी लवकर म्हणजेच उन वाढण्यापूर्वी मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारावी. सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून गुढी उतरवावी.
मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी विशेष तयारी करण्यात येत आहे. घरोघरी गुढी उभारून मांगल्याची, भरभराटीची आणि समृद्धीची कामना करण्यात येते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर घरोघरी गुढ्या उभारून, तोरण लावून नवीन वर्षाचे स्वागत करावे आणि पाडव्याचा आनंद साजरा करावा, अशी माहिती ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली.दाते म्हणाले, ‘गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करुन, आंब्याच्या पानांची तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.
आपली कालगणना हजारों वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते. म्हणून संवत्सराच्या आरंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्यासाठी कोणतेही बंधन नाही, त्यामुळे गुढीपूजन आणि पंचांगपूजन अवश्य करावे, गुढीपूजन करण्यासाठी कोणताही विधी नाही आणि मुहूर्तदेखील नाही. आपल्या कुलाचारानुसार आपल्या सोयीनुसार गुढीपूजन करावे.’
गुढी उभारल्यानंतर घरातील स्वयंपाकाचा नैवेद्य गुढीला दाखवावा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कुटुंबीयांसमवेत एकत्रित मिष्टान्न भोजनाचा आनंद घ्यावा. या सणाच्या निमित्ताने वेगळे राहणारे भाऊ आणि कुटुंबीयांनी एकत्र येत नववर्षारंभाचा दिवस गुण्यागोविंदाने साजरा करावा, असेही मोहन दाते यांनी सांगितले.
अशी उभारावी गुढी
- गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे.
- गुढी उभारण्यासाठी वापरण्यात येणारी काठी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावी.
- या रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे,
- गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची गाठी घालावी.
- जेथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
- शुचिर्भूत होऊन गुढी अभारावी.
- साखरेची गाठी,हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी.
- गुढी उभारून झाल्यानंतर घरातील लहान मुलांच्या गळ्यामध्ये साखरेची गाठी घालावी.
- ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते.