पुणे : नांदेड गाव परिसरात गुइलेन बॅर सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने संपूर्ण जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्राची तपासणी सुरू केली आहे. कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान (एनआयव्ही) संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत कोंबड्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस यांचा संसर्ग आढळून आला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरले आहेत.
पुण्यातील नांदेड गाव परिसरात जीबीएसचा उद्रेक झाला होता. या भागातील जीबीएस रुग्णसंख्या अचानक वाढल्याने यामागील कारणांचा शोध आरोग्य विभागाने सुरू केला होता. यासाठी त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले. पशुसंवर्धन विभागानेही पुणे जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्रांची तपासणी सुरू केली. या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते.
पशुसंवर्धन विभागाने पुणे जिल्ह्यातील विविध कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या विष्ठेचे १०६ नमुने एनआयव्हीकडे पाठविले होते. एनआयव्हीने कोंबड्यांच्या विष्ठेचा तपासणी अहवाल आता आरोग्य विभागाला पाठविला आहे. कोंबड्यांच्या विष्ठेच्या ६६ नमुन्यांची कॅम्पायलोबॅक्टर जेजुनीसाठी तपासणी करण्यात आली. त्यात २३ नमुन्यांमध्ये हा संसर्ग आढळून आला. याचवेळी ६० नमुन्यांची नोरोव्हायरससाठी चाचणी करण्यात आली आणि त्यातील ५ नमुन्यांमध्ये हा संसर्ग आढळून आला. अद्याप काही नमुन्यांची तपासणी झाली नसून, हे अहवाल प्रलंबित आहेत.
जीबीएस उद्रेकाशी संबंध नाही
याबाबत महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की, पशुसंवर्धन विभागाने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचे विष्ठा नमुने तपासणीसाठी पाठविले होते. एनआयव्हीने केलेल्या तपासणीत त्यात कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस संसर्ग आढळून आला आहे. मात्र, नांदेड गाव वगळता जिल्ह्यात इतरत्र कुठेही जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून आलेली नाही. कोंबड्यांतून नागरिकांना हा संसर्ग झाला असता तर सगळीकडे रुग्णसंख्येत वाढ दिसली असती. त्यामुळे जीबीएस उद्रेकाशी कोंबड्यांच्या संबंध असल्याचे निष्पन्न झालेले नाही.
जीबीएसची रुग्णसंख्या २१० वर
राज्यातील जीबीएस रुग्णसंख्या २१० वर पोहोचली आहे. त्यात पुणे महापालिका ४२ रुग्ण, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९१, पिंपरी-चिंचवड महापालिका ३२, पुणे ग्रामीण ३२ आणि इतर जिल्ह्यांतील १० रुग्ण आहेत. जीबीएसमुळे राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या ४१ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत १३५ रुग्ण हे रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत.