पुणे : कुक्कुट पक्ष्यांचा ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या प्रादुर्भावाशी संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार खडकवासला धरणाच्या नजिकच्या लोकवस्त्यांमधील कुक्कुट पक्ष्यांचे क्लोॲकल स्वॅब नमुने, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करुन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेस परिक्षणासाठी सादर करुन तपासणीची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.
पुणे शहराजवळील खडकवासला धरणाच्या नजिकच्या लोकवस्त्यांमध्ये गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दूषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधीत क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरणाच्या भागातील ११ कुक्कुट प्रक्षेत्राना भेट दिली. या प्रक्षेत्रामध्ये वेंकटेश्वरा समुहाचे ६ अंडी देण्यासाठी कुक्कुट पक्षी संगोपन करणारे प्रक्षेत्र आणि ५ व्यक्तिगत मांसल कुक्कुट पालन प्रक्षेत्र आहेत. वेंकटेश्वरा समुहाचे कुक्कुट पालन प्रक्षेत्रावर जैवसुरक्षा पालन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले व त्यापैकी दोन प्रक्षेत्रासाठी पक्ष्यांद्वारे उत्सर्जित मैला प्रक्रिया व्यवस्था आहे. इतर प्रक्षेत्रावर मैला साठवण व्यवस्था आहे. सदर पक्ष्यांचा मैला शेतीसाठी खत म्हणून विक्री करण्यात येतो.
व्यक्तिगत कुक्कुट पालकांच्या ५ प्रक्षेत्रावर गादी पध्दतीने मांसल कुक्कुट पालन करण्यात येत आहे. या प्रक्षेत्रावर साधारणत: ४५ दिवसात बॅच विक्रीस तयार होते. पक्षी विकी नंतर पक्षीघरातील तुस-गादीची विक्री शेतीसाठी खत म्हणून करण्यात येते. पथकास या प्रक्षेत्रांच्या पासून उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळत नसल्याचे आढळून आले आहे.
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार एकूण नमुन्यांपैकी १०६ क्लोॲकल स्वॅब ८९ व कुक्कुट विष्ठा १७ तसेच नमुने (९ प्रक्षेत्रावरील २ कुक्कुट विष्ठा आणि २२ क्लॉॲकल स्वॅब नमुने) कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय या जीवाणूसाठी होकारात्मक आलेले आहेत. एका प्रक्षेत्रावरील ५ नमुने नोरोव्हायरससाठी होकारात्मक आलेले आहेत.
नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेने कुक्कुट प्रक्षेत्रावरील २९ पाणी नमुने तपासले असून त्यापैकी २६ पाणी नमुने कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय अस्तित्व नकारार्थी आहे आणि उर्वरित ३ नमुने तपासणी सुरु आहे. कुक्कुट प्रक्षेत्र धारकांनी जैवसुरक्षा सुनिश्चित करावी. व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रक्षेत्राचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे. कोणतेही कुक्कुट पक्षी उत्सर्जने पाणवठ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.
पाणी स्रोत दूषित नाहीत
कुक्कुट पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये कंम्पायलो बॅक्टर जेजूनाय हा सामान्यत: अस्तित्वात असणारा जीवाणू आहे. तसेच हा जीवाणू इतर प्राणी व मानवांतही आढळतो. ही शास्त्रोक्त माहिती आहे. परिक्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्रावरील सांडपाणी अथवा विष्ठा नजीकच्या पाणी स्त्रोतात मिसळले नसल्याने काही दूरचित्रवाहिन्या या आजाराचा कुक्कुट पक्ष्यांपासून पसरत असल्याच्या चुकीच्या बातम्या देत आहेत. यामुळे कुक्कुट पालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे.
पावसाळा ऋतुत कॉलरासारखे आजार दूषित अन्न पाण्यामुळे होतात तसेच कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय जीवाणू आजारास कारणीभूत ठरू शकतात. कच्चे अर्धवट शिजवलेल्या मासांतून हा जीवाणूचा प्रसार होतो. यासाठी पाणी उकलून तसेच ब्लीचिंग पावडरची योग्य मात्रेत प्रक्रिया करुनच पिण्यास वापरावे. भाज्या व मांस स्वच्छ करुन व पुर्ण शिजवूनच सेवन करण्यात यावे. हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्यास या जीवाणूचा संसर्ग होत नाही. त्यामुळे चिकन खाण्यास हरकत नाही. -डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त