पुणे : ‘‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळलेल्या सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी, नांदोशी, बारंगणे मळा, धायरी, खडकवासला या गावांना शक्य तितक्या लवकर महापालिकेच्या जलशुद्धीकरणातून शुद्ध केलेेले पाणी द्यायला हवे,’ असे महापालिकेने केलेल्या पाण्याच्या तपासणी अहवालामध्ये म्हटले आहे. दरम्यान, ‘या भागातील विहिरी आणि जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचा आदेश दिला आहे,’ असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या खडकवासला, किरकिटवाडी तसेच धायरी, नांदोशी या गावांतील नागरिकांमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ आजाराची लक्षणे आढळल्याचे समोर आल्यानंतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून खराब पाण्याचा पुरवठा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ज्या विहिरीतून गावांना पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी केली. यावेळी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी यांच्यासह पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने या गावांतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आला आहे. यामध्ये काही भागातील मोजक्या तक्रारी वगळता बहुतांश ठिकाणी पाण्यामध्ये क्लोरिनची मात्रा पुरेशी (रेसिड्युअल क्लोरिन टेस्ट) आढळली, असे पर्वती जलकेंद्राच्या रसायनशास्त्रज्ञांच्या अहवालात म्हटले आहे. या परिसरात दिल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये ‘कॉलिफॉर्म’ व ‘ई कोलाय बॅक्टेरिया’ नसल्याचे पालिकेच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या गावांतील नागरिकांना सध्या केवळ पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याचा गढूळपणा व ‘झू प्लान्कटन’सारखे (सायक्लोप्स) घटक नियंत्रित करणे शक्य होत नाही, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे या गावांमधील नागरिकांनाही महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी देण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अशी शिफारस अहवालात केली आहे.

‘जलस्रोतांमध्ये दूषित घटक नाहीत’

या गावांतील विहिरीला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी चर्चा केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘या गावातील विहिरी व जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचा आदेश पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. काही ठिकाणी जलवाहिन्यांशेजारी सांडपाणी साठत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे येथे साचलेले पाणी काढून टाकून आवश्यक तेथे नव्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाची ८५ पथके या परिसरात सर्वेक्षण करत आहेत. फक्त ‘फिल्टर’ केलेले पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांनी सध्या पाणी उकळून थंड करून प्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. सविस्तर अहवाल लवकरच प्राप्त होईल.’

विहिरीला संरक्षक जाळी बसविणार

नांदेड गावातील विहिरीला संरक्षक जाळी नाही. याकडे नागरिकांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर विहिरीला तातडीने संरक्षक जाळी बसवून घेण्याच्या व पाण्याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना आयुक्त भोसले यांनी दिल्या.

किरकटवाडी, खडकवासला भागातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो त्या विहिरीला जाळीदेखील नाही. त्यामुळे विहिरीत कचरा पडू शकतो. याच विहिरीजवळ सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर आहेत. तसेच, विहिरीच्या आसपास कचरा पडलेला असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guillain barre syndrome patients in pune city what exactly was said in the report of the pune municipal corporation pune print news ccm asj