पुणे : गुजरातमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलााल धमकावून लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली. तरुणाचे अपहरणा करुन त्याला नदीपात्रात लुटण्यात आले. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत बलभद्रसिंग नटवरसिंग जाडेजा (वय २५, सध्या रा. नलावडे सदन, गावकोस मारुतीजवळ, कसबा पेठ, मूळ रा. कच्छ, गुजरात) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलभद्रसिंग याचे वडील अहमदाबाद पोलीस दलात आहेत. तो आठवड्यापूर्वी पुण्यात फिरायला आला होता. त्याचा चुलतभाऊ कसबा पेठेत राहायला आहे. शुक्रवारी रात्री त्याचे पोट दुखू लागल्याने तो घराबाहेर पडला. तो सोडा पिण्यासाठी निघाला होता. गावकाेस मारुतीजवळ त्याने एका दुचाकीस्वाराला थांबविले. सोडा कुठे मिळतो, अशी विचारणा त्याने केली. दुचाकीस्वाराने त्याला दुकान दाखवितो, असे सांगून त्याला दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवरुन आणखी दोघे जण आले. काही अंतरावर दुचाकी थांबविण्यात आली. बलभद्रसिंग याच्या डोळ्याला पट्टी बांधली.
त्याला दुचाकीवरुन नदीपात्रात नेले. त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. तिघांनी त्याला धमकावून त्याच्याकडील दहा हजार रुपये आमि मोबाइल संच काढून घेतला. त्याला मारहाण करुन आणखी पैशांची मागणी केली. तेव्हा पैसे नसल्याचे त्याने सांगितले. चोरट्यांनी त्याच्या चुलतभावाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली. चुलतभावाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला दारुवाला पूल परिसरातील देवजीबाबा मंदिराजवळ सोडून चोरटे पसार झाले. घाबरलेला बलभद्रसिंग चुलतभऊ जयेंद्रसिंग याच्याकडे पोहोचला. त्याला या घटनेची माहिती दिली.