इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या (आयवा) तीन दिवसीय ५५ व्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात झाले. हे अधिवेशन पुण्यातील हडपसर येथील मेस्से ग्लोबल सेंटर (लक्ष्मी लॉन्स) येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी नेहमीच्या शैलीत भाषण केले. ‘मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात. पण मला भाऊ व्हायचे नाही, तर मला ‘पाणीवाला बाबा’ व्हायचे आहे. कारण पाणी पाजणे हे पुण्याचे काम असून, आपल्याला ते करायचे आहे. ‘वर दाढीवाला, इथे मंत्री दाढीवाला आणि सचिवही दाढीवाला’ असे म्हणत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागात प्रधान सचिव संजीव जैसवाल असल्याची टिप्पणी गुलाबराव पाटील यांनी केली.
हेही वाचा – पुणे : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैसवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, ‘आयवा’चे मावळते अध्यक्ष प्रमोद कुमार सिन्हा, नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष भुजबळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. मथियालगन, राष्ट्रीय महासचिव डॉ. दयानंद पानसे, संयोजन समिती सचिव व अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, उपाध्यक्ष पी. डी. भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, आयवा पुणेचे सचिव के. एन. पाटे आदी या वेळी उपस्थित होते.
अधिवेशनात प्रज्ञावंताचा मेळा भरला आहे. मी काही इतका शिकलेलो किंवा हुशार नाही, पण तुमच्यासमवेत बसून तज्ज्ञता येते. त्यामुळे, जनतेला पाणी देण्यासाठी आपण एकत्रित काम करू. देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राकडून भरपूर निधी मिळत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला निधीची कमतरता नाही. आजवर राज्य सरकारने ९७ टक्के कामाच्या निविदा काढल्या आहेत. राज्यात मोठ्या स्वरूपात भूजल संरक्षणाचे काम सुरू असून, नैसर्गिक २७०० स्त्रोत शोधून कामासाठी मंजूर केले आहेत. जलजीवन मिशनवर काम करणारा कार्यकर्ता असून, येणाऱ्या काळात प्रत्येकाला स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे उद्दिष्ट्य आहे, असे प्रतिपादनही गुलाबराव पाटील यांनी केले.