पिंपरी: मावळ लोकसभेतील पाणी योजना; तसेच वनखात्याच्या परवानगीअभावी रखडलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ‘जल जीवन मिशन’अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सद्यस्थितीत चालू असलेल्या आणि भविष्यातील पाणीपुरवठा संदर्भातील कामांचा आढावा घेण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, विभागाचे प्रधान सचिव संजय जयस्वाल आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुणे : डिझेल अभावी एसटी बस फेऱ्या रद्द; स्वारगेट स्थानकात गोंधळ, प्रवाशांना मन:स्ताप
मावळ लोकसभा मतदारसंघातील घारापुरी बेटावर तीन गावे आहेत. त्यासाठी घारापुरी बेटावर पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. ही योजना सुमारे १७ कोटी ६० लाख रुपयांची असून या निर्णयाला लवकरच मंत्रीमंडळाची मान्यता घेतली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. वनखात्याच्या परवानगीमुळे मावळातील पाणीपुरवठ्याची रखडलेली कामेही मार्गी लागणार आहेत. त्याबाबत लवकरच वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. याशिवाय, कार्ला, वाढीव डोंगरगाव, कुसगाव, डोणे, आढळे नळ पाणीपुरवठा योजना, खडकाळे, कामशेत, पाटण येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामे मंजूर झाली आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत, तर काही रखडली आहेत. कर्जत, खालापूर, उरण आणि मावळ या ग्रामीण भागासाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील कामांचाही आढावा घेण्यात आला. त्या अंतर्गत असणारी कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश मंत्र्यांनी बैठकीत दिले, असे बारणे यांनी सांगितले.