ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या कविता हिंदूीमध्ये अनुवादित करून मराठीशी नाळ जोडणाऱ्या गुलजार यांच्या उपस्थितीने पिंपरी-चिंचवड साहित्य संमेलन ‘गुलजार’ होणार आहे. ज्येष्ठ कवी-गीतकार गुलजार यांनी संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे १५ ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये पिंपरी-चिंचवड येथील हिंदूुस्थान अँटिबायोटिक्सच्या मैदानावर ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या नियोजित कार्यक्रमांची रुपरेषा नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये तीन मुलाखती होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घोषित केले आहे. अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या मुलाखती होणार असल्याचे समजते. त्याचबरोबरीने या संमेलनाची उंची वाढविण्यासाठी गुलजार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ कवी गुलजार हे आपल्याला त्यांच्या तरल कविता आणि गजल यामुळे माहीत आहेत. त्यांच्या चित्रपट गीतांमधील काव्याची जादू ही रसिकांच्या हृदयामध्ये अढळस्थानी आहे. केवळ हिंदूी आणि ऊर्दूपुरतेच स्वत:ला सीमित न ठेवता गुलजार यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांना हिंदूीमध्ये शब्दरूप दिले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रज यांचे काव्य राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे श्रेय गुलजार यांच्याकडेच जाते. ‘कणा’ या कवितेला गुलजार स्पर्श झाल्याने ही कविता जगभरात गेली आहे. गुलजार ही कविता सादर करतात तेव्हा हे काव्य ऐकणाऱ्या रसिकांच्या डोळे अश्रूंनी डबडबतात याचा अनुभव मराठी रसिकांनी अनेकदा घेतला आहे. या काव्याचे श्रेय कुसुमाग्रज यांचे आहे, असे गुलजार यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितल्याचे पुणेकरांनी अनुभवले आहे.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी गुलजार यांची भेट घेऊन त्यांना संमेलनासाठी निमंत्रित केले. हे निमंत्रण गुलजार यांनी स्वीकारले असून या संमेलनामध्ये एक दिवस सहभागी होण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे संमेलनात त्यांची मुलाखत किंवा कविता वाचनाचा कार्यक्रम करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा