‘मेरा हिंदोस्ताँ तुम्हारे पास है. उसे मत लौटाना, उसे मेहेफूस रखना और आगे ले जाना.’ अशा शब्दात ज्येष्ठ कवी गुलजार यांनी तरुणाईला केलेले आव्हान. आणि गुलजारांच्या शब्दांनी भारावलेली तरुणाई अशा वातावरणात भारत अस्मिता पुरस्कार समारंभ मंगळवारी झाला. ‘तुम्हा तरुणांना आम्ही काय सल्ला देणार? सध्या भ्रष्टाचार आणि इतर घटनांनी देश इतका बरबटला आहे, की त्याचा दोष आमच्या पिढीचा आहे. त्यामुळे आजच्या तरुणांना सांगण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही,’ असे मत गुलजार यांनी या वेळी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर गुलजार बोलत होते. या वेळी उद्योजिका, खासदार अनू आगा यांना ‘भारत अस्मिता जीवनगौरव पुरस्कार’, बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट येथील प्राध्यापक त्रिलोचन शास्त्री यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ’ पुरस्कार, कर्नाटकमधील खासदार अनंतकुमार हेगडे यांना ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ’ पुरस्कार, पत्रकारितेतील योगदानाबद्दल डॉ. दिलीप पाडगावकर यांना ‘भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. या वेळी संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. आर. अय्यर, माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, विश्वस्त डॉ. चंद्रकांत पांडव, भारत अस्मिता पुरस्कार समितीचे समन्वयक डॉ. राहुल कराड, एमआयटीचे संचालक डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते.
या वेळी गुलजार म्हणाले, ‘मला माझा देश कधी आठवावा लागत नाही. तो माझ्या श्वासांचा भाग झाला आहे. आजच्या तरुणांकडे खूप क्षमता आहे, कल्पकता आहे. त्यांच्याकडे पाहिले की देश सुरक्षित असल्याची खात्री पटते. आता तरुणांची वेळ आहे. याचा खूप मोठा इतिहास आहे. मात्र, त्यातच रमणे म्हणजे दलदलीत फसण्यासारखे आहे. नेहमी पुढे चालत राहा आणि तुमच्याबरोबर देशालाही पुढे घेऊन जा.’
 चलो वतन की बात करे
‘चलो ना चलते चले, और वतन की बात करे;
उम्मीदो शौक की बात करे। उम्मीदे हाफिज रही है अभितक,
बागबानोंमे जो बन रहा है चमन उसकी बात करे,
चलो ना चलते चले, और वतन की बात करे।’
असे आव्हानच गुलजारांनी तरुणाईला केले. गुलजारांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या अशा काव्यपंक्तींनी वातावरण भारून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा