पुणे : पुरुष असून स्त्रीच्या भावना आणि स्त्री असून पुरुषाच्या भावना अभिव्यक्त करणारे कवितालेखन हा एक प्रकारचा परकाया प्रवेशच आहे, असे मत प्रसिद्ध कवी-गीतकार गुरु ठाकूर यांनी व्यक्त केले. ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’ या लावणीचे लेखन करताना शांता शेळके यांचे ‘हिची चाल तुरुतुरु’ हे गीत माझ्यासाठी आदर्श होते, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी : घाणेरड्या पद्धतीने सादर होणाऱ्या लावण्यांवर बंदी घाला; लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर – काळे यांची मागणी

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी सांगतेनिमित्त महाराष्ट्र शासन, कलांगण, मुक्तछंद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने आयोजित ‘आठवणीतल्या शांताबाई’ कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डाॅ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते गुरु ठाकूर यांना शांता शेळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ठाकूर बोलत होते. ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सांस्कृतिक संचालनालयाच्या उपसंचालक सुनीता असवले-मुंढे, ‘ऐसी अक्षरे’चे समीर बेलवलकर, पद्मनाभ हिंगे, मुक्तछंद संस्थेच्या मेधा कुलकर्णी आणि माजी नगरसेवक जयंत भावे या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा >>> पुणे : लोणी काळभोरमध्ये पेट्रोल चोरट्यांच्या अड्ड्यावर छापा; ८० लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

ठाकूर म्हणाले, ज्यांनी शब्दांवर संस्कार केले आणि ज्यांच्या शब्दांचे संस्कार माझ्यावर झाले त्या शांता शेळके यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. लहानपणी अबोल असलेल्या या मुलाचे काय होणार अशी चिंता असताना माझ्या आईला होती. पण, नंतर चित्र आणि काव्यातून अभिव्यक्ती होऊ लागली तेव्हा माझे कौतुक झाले. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या श्रवणीय गीतांच्या शब्दांनी मला घडविले. ‘असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे’ या कवितेतून शांताबाईंनी सर्व कवीची भूमिकाच मांडली आहे. मी उद्या नसलो तरी माझे गीत असेल. त्यामुळे माझी ओळख असलेल्या गीतांवर माझा शिक्का असला पाहिजे हा कटाक्ष असतो. ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गीत २० वर्षांनंतरही रसिकांना आवडते. याचा अर्थ मी योग्य मार्गावर आहे.

हेही वाचा >>> पुणे : राहुल गांधीच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शहरात भाजपच्या वतीने आंदोलन

ढेरे म्हणाल्या, कलावंत नेहमी अतृप्त आणि अस्वस्थ रहावा. तो तसा असेल तरच त्याच्या हातून उत्तम निर्मिती होते. दवणे म्हणाले, शंभरी अनेकांची भरते. पण, शताब्दी क्वचितच कोणाची होते. शंभरीची शताब्दी होण्यासाठी आपण समाजाला काही द्यावे लागते. असे भरभरून दिल्यामुळे शताब्दीचे भाग्य शांता शेळके यांना लाभले.  जोशी, कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. चैत्राली अभ्यंकर, संजीव मेहेंदळे आणि हेमंत वाळुंजकर यांनी शांता शेळके यांची लोकप्रिय गीते सादर केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru thakur opinion poetry writing profession woman man feelings pune print news ysh