लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पोलिसांनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रक पोलीस चौकीसमोरुन चोरून पसार झालेल्या गुटखा तस्कराला राजगड पोलिसांनी पावणे दोन वर्षांनी अटक केली. गुटखा तस्कराकडून दोन आधारकार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले असून, व्यवहारांची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या तस्कराला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
निजामउद्दीन महेबुब शेख (वय ४०, मूळ रा. लोहियानगर, गंजपेठ, सध्या रा. मयूरपंख सोसायटी, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा तस्कराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने २८ मे २०२३ रोजी पुणे-सातारा रस्त्यावर कारवाई करुन गुटख्याचा ट्रक जप्त केला होता. पोलिसांनी ४१ लाख १३ हजारांचा गुटखा, ट्रक असा ५१ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता.
पोलिसांनी गुटख्याच्या पोत्यांसह जप्त केलेला ट्रक खेड शिवापूर पोलीस चौकीसमोर लावला होता. मध्यरात्री पोलीस चौकीसमोर लावलेला ट्रक चोरून नेण्यात आल्याची घटना घडली होती. पोलीस चौकीपासून चार किलोमींटर अंतरावर गुटख्याचा ट्रक सोडून देण्यात आला. ट्रकमधील पोती चोरून नेण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने निखील नहार याच्या गोदामावर छापा टाकून गुटखा जप्त केला होता. पोलिसांनी नहार याची चौकशी केली. तेव्हा निजामउद्दीन शेखने गुटख्याचा पुरवठा केल्याची माहिती तपासात मिळाली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. शेख याला शुक्रवारी (२८ मार्च) पोलिसांनी अटक केली. शेख याच्याविरुद्ध पुण्यातील येरवडा, खडक, काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. गुटखा तस्करी प्रकरणात तो पसार होता. शेख याला अटक करण्यात आली असून, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का ? यादृष्टीने तपास करण्या येत असल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली.
कोट्यवधींचे व्यवहार?
गुटखा तस्कर निजामुद्दीने शेख याच्याकडे दोन नावे असलेले आधारकार्ड मोबाइलमध्ये मिळून आले आहेत. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालवधीत शेख याच्या बँक खात्यात आठ कोटी ५४ लाख ८२ हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहेत. शेख याच्या खात्यातील व्यवहारांची माहिती घ्यायची असल्याने पोलिसांनी आठ दिवस पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.