ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संशोधन केंद्र, दिशा आयसर आणि जाणीव संघटना यांच्यातर्फे ‘ज्ञान-सेतू’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत राज्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती या उपक्रमाचे मुख्य समन्वयक विवेक पोंक्षे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली.
या वेळी या उपक्रमाचे समन्वयक श्रीकांत गबाले उपस्थित होते. आसाम, अरूणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगढ या राज्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पुण्यातील एक गट पंधरा दिवसांसाठी या राज्यांमधील दुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन विज्ञान विषयाची एक दिवसाची कार्यशाळा घेणार आहेत. विद्यार्थ्यांना छोटय़ा छोटय़ा प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाचे मूळ तत्त्व समजावून देणे, विविध प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखवणे, गाणी – नाटुकल्यांच्या माध्यमातून विज्ञान उलगडून दाखवणे असे उपक्रम या कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ‘ज्ञान-सेतू’ या उपक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्ती घेतलेले नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. उपक्रमामध्ये सहभागी स्वयंसेवकांच्या निवासाची आणि भोजनाची सोय आयोजकांकडून करण्यात येणार आहे, तर प्रवासाचा खर्च सहभागींनी स्वत: करायचा आहे.
याबाबत पोंक्षे म्हणाले, ‘‘बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच स्वयंसेवकांनाही नवे काही शिकता यावे असा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. १५ ऑगस्टपासून या उपक्रमाची सुरूवात करण्यात येणार असून एक वर्ष हा उपक्रम राबवला जाणार आहे. सहभागी स्वयंसेवकांचेही प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये साधारण २०० स्वयंसेवक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.’’
‘ज्ञान-सेतू’मध्ये सहभागी होण्यासाठी (०२०) २४२०७१९३ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा gyansetu.erc@gmail.com यावर ई-मेल करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.