विज्ञानातील वैशिष्टय़पूर्ण योगदानासाठी दिला जाणारा एच. के. फिरोदिया पुरस्कार यंदा ज्येष्ठ गणितज्ज्ञ एम. एस. नरसिंहन आणि भौतिकशास्त्राचे संशोधक प्रा. दिपंकर दास शर्मा यांना जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुरस्काराचे हे अठरावे वर्ष असून अनुक्रमे दोन लाख आणि एक लाख रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
नरसिंहन हे बंगळुरू येथील गणितज्ज्ञ आहेत. ‘स्टेबल अँड युनिटरी व्हेक्टर बंडल्स ऑन कॉम्पॅक्ट रीमन सरफेस’ या जगप्रसिद्ध प्रमेयाच्या मांडणीत नरसिंहन यांचा सहभाग आहे. तर दिपंकर दास शर्मा यांचा घनभौतिकी, रसायनशास्त्र, आणि नॅनो विज्ञान या विषयांचा विशेष अभ्यास आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांचा सन्मान ज्येष्ठ शास्त्रज्ञ मनमोहन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत केला जाणार आहे. मनमोहन शर्मा हे मुंबईतील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’चे मानद प्राध्यापक आहेत. २७ नोव्हेंबरला सायंकाळी सव्वासहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार सोहळा होईल.
या वेळी पुरस्कारार्थीच्या जीवनावरील लघुचित्रफिती दाखवल्या जाणार असून त्यांचे विचार ऐकण्याची संधीही विज्ञानप्रेमींना मिळणार आहे. नरसिंहन या वेळी ‘मेकिंग मॅथेमॅटिक्स अ करियर’ या विषयावर तर दिपंकर दास शर्मा ‘द मिरॅक्युलस वर्ल्ड ऑफ मटेरियल्स’ या विषयावर बोलणार आहेत. आतापर्यंतचा एच. के. फिरोदिया पुरस्कारांचा प्रवास उलगडणाऱ्या संकेतस्थळाचेही या वेळी उद्घाटन करण्यात येईल. या संकेतस्थळावर नवोदित संशोधक ज्येष्ठ संशोधकांना प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधू शकणार आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा