पुणे : महाविकास आघाडीकडून हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याला महाविकास आघाडीतूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. हडपसरचा उमेदवार बदला, अशी मागणी जोर धरू लागली असून, त्यासाठी माजी राज्यमंत्री आणि माजी आमदारांसह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकांनी ‘हडपसर विकास आघाडी’ची स्थापना केली आहे. उमेदवार न बदलल्यास सन २००२ च्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ‘हडपसर विकास आघाडी’चा पॅटर्न राबविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे राहिला आहे. या मतदारसंघात अजित पवार समर्थक चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत आणि तेच महायुतीचे उमेदवार आहेत. हडपसर मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाला मिळावा, अशी आग्रही मागणी माजी आमदार महादेव बाबर यांनी महाविकास आघाडीकडे केली होती. मात्र, या मतदारसंघातून प्रशांत जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. जगताप यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील माजी नगरसेवक योगेश ससाणे, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन ‘हडपसर विकास आघाडी’ची स्थापना केली आहे. यामध्ये सर्व पक्षांचे मिळून दहा माजी नगरसेवक असल्याचा दावाही करण्यात आला असून, आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांची रविवारी मुंबईत भेट घेतली आणि जगताप यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. ‘महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा फेरविचार करावा,’ अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली.
हेही वाचा : दिवाळीत चितळे बंधू मिठाई विक्री दुकानात चोरी, गल्ल्यातील दीड लाखांची रोकड लंपास
u
‘उमेदवार बदला, अन्यथा…’
‘हडपसर विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार लादण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार बदलाचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांना हडपसर विकास आघाडीकडून देण्यात आला आहे. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, उमेदवार न बदलल्यास हडपसर विकास आघाडीकडून निवडणूक लढविली जाईल,’ असा इशारा माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे.