पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील चौरंगी लढतीमध्ये महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाने केलेली बंडखोरी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारासाठी अडचणीची ठरणार की नाही? याचे उत्तर निकालानंतर मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना बंडखोर उमेदवार कोणाची मते घेणार यावर या मतदारसंघाच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तीन टक्क्यांनी वाढल्याने मतांचे दान ज्या उमेदवाराच्या पदरात पडेल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात अधिक मतदार असलेला मतदारसंघ म्हणून हडपसर मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात ६ लाख २५ हजार मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदारांची संख्या एक लाख २० हजाराने वाढली असून मतदानाच्या टक्क्यातही वाढ झाली आहे. २०१९ मध्ये हडपसरमध्ये ४७.२३ टक्के मतदान झाले होेते. या निवडणुकीत ते ५०.११ टक्क्यांवर गेले आहे. तीन टक्के मतदान वाढले असले तरी शहराच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत मात्र सर्वात कमी मतदान याच मतदारसंघात झाले आहे.
हेही वाचा – प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार?
महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे चेतन तुपे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रशांत जगताप, मनसेकडून साईनाथ बाबर तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बंडखोर गंगाधर बधे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. मागील निवडणुकीत तुपे यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा अवघ्या पावणेतीन हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते तुपे यांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली होती. मोरे यांना ३५ हजार, एमआयएमच्या उमेदवाराला ८ हजार तर वंचितच्या उमेदवाराला साडेसात हजार मते मिळाली होती.
आमदार तुपे यांनी पराभव केलेले टिळेकर या निवडणुकीत तुपे यांच्या बरोबर होते. तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक बधे यांना शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पाठिंबा देत त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे प्रशांत जगताप यांच्या अडचणी वाढल्या. मनसे आणि अपक्ष उमेदवार या निवडणुकीत कोणाची मते घेणार यावर या मतदारसंघाचा विजय अवलंबून आहे.
हेही वाचा – ‘मावळ पॅटर्न’ यशस्वी होणार का?
‘एम’ फॅक्टर चा फायदा कोणाला?
हडपसरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. या मतदारसंघात मराठा, माळी, मुस्लिम आणि मराठवाडा असा ‘एम’ फॅक्टर चालतो. हा वर्ग कोणाच्या मागे उभा राहिला, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. हडपसरमध्ये प्रत्येकवेळी नवीन आमदार होतो, अशी परंपरा आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील ही परंपरा सुरू राहणार की दोनवेळा आमदार होण्याचा नवीन इतिहास घडणार हे शनिवारी मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.