पुणे : वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सुनील कुमार (वय ४५), सौरभ गुप्ता (वय ४०), विकास गुप्ता (वय २८), रणधीर सिंग (वय ३०), प्रियांका मिश्रा यांच्यासह एकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हडपसर भागातील मगरपट्टा सिटी भागात राहायला आहेत.
तक्रारदार व्यावसायिकाच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. आरोपी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहायला आहेत आरोपींशी व्यावसायिकाची एका परिचितामार्फत ओळख झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिकाने आरोपींची भेट घेतली. आरोपींनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी ६० लाख रुपये घेतले. त्यांनी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात आरोपींना पैसे दिले.
पैसे दिल्यानंतर व्यवासायिकाच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून दिला नाही. त्यांनी आरोपोंकडे विचारणा केली. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपीना त्यांनी पैसे परत करण्यास सांगितले. आरोपींनी २० लाख रुपये परत केले. उर्वरित ४० लाख रुपये दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.