पुणे : ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर भागातील मगरपट्टा चौकात घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागातील भोसले गार्डन परिसरात राहायला आहेत.
२२ जानेवारी रोजी त्या वानवडीतील कमांड हाॅस्पिटलमध्ये निघाल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाजवळ त्या रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. परिसरातील महादेव मंदिराजवळ दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याकडील ४२ हजारांचे सोन्याचे दागिने आणि पैसे ठेवलेले पाकिट असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कर्वेनगर, कोथरुड भागात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलाकंडील दागिने चोरुन नेण्याच्या घटना नुकतीच घडली.