पुणे : हडपसर विधानसभेत शिवसेना (शिंदे) पक्षाची ताकत चांगली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा, येथून पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी भानगिरे यांच्या समर्थकांनी ‘वर्षा’वर धाव घेतली आहे. मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी हे पदाधिकारी गेले आहेत.

विधानसभेच्या आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला आहे. त्यासाठीच्या जागावाटपाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. जागावाटपाच्या प्राथमिक सूत्रानुसार, महायुतीत सहभागी असलेल्या पक्षाचा विद्यमान आमदार ज्या मतदारसंघात असेल, तेथून संबंधित पक्षाच्या उमेदवाराला संधी दिली जाईल, असे ठरविण्यात आले आहे. मात्र, हा निकष लावल्यास पुणे शहरातील एकही जागा महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे शहरात असल्याने विधानसभेच्या जागा वाटपामध्ये आठपैकी तीन जागा मिळाव्यात, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा – पुणे : सणासुदीत वाहन चोरट्यांचा उच्छाद, ११ दुचाकी, दोन रिक्षांची चोरी

हडपसर मतदारसंघातून नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांच्या समर्थकांनी थेट वर्षा बंगला गाठला आहे. हडपसर मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटावा, यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख अमर घुले, समन्वयक अभिमन्यू भानगिरे, पंकज कोद्रे, दीपक कुलाल, सचिन तरवडे यांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती देताना पक्षाचे मुख्य प्रवक्ते अभिजित बोराटे म्हणाले, की पुणे शहरात आणि जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी हडपसरची जागा घेऊन तेथून भानगिरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी आमची आहे. भानगिरे हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मागच्या दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी या भागाच्या विकासासाठी ३०० कोटींपेक्षा अधिक जास्त निधी त्यांनी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी पदाधिकाऱ्यांची भावना असल्याचे बोराटे म्हणाले.

हडपसरप्रमाणेच खडकवासला, वडगाव शेरी या तीन मतदारसंघांतील जागा शिवसेना (शिंदे) पक्षाने मागितल्या आहेत. यावर येत्या काही दिवसांतच शिक्कामोर्तब होणार आहे. हडपसर भागातून महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. या जागेसाठी शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे हेदेखील इच्छुक असून, त्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – ‘पर्वती’मध्ये आमदार मिसाळांची धाकधूक वाढली?

महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हडपसरची जागा आम्हाला सुटली असून माजी आमदार महादेव बाबर येथून उमेदवार असतील, असे जाहीर केले होते. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.