लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत आज, बुधवारी तुरळक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील चार दिवस संपूर्ण विदर्भ आणि सलग्न मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून मोठ्या प्रमाणात आर्द्रता मध्य भारतात येते आहे. विदर्भात तापमान सरासरी ४०.० अंश सेल्सिअसच्या घरात आहे. प्रखर उष्मा आणि आर्द्रतेमुळे विदर्भावर उंच उंच ढग तयार होत आहेत. साधारणपणे ८ ते १० किलोमीटर उंचीचे ढग तयार होत आहेत. जास्त उंचीचे ढग तयार झाल्यामुळे ढगातील तापमान शून्य अंशांच्या खाली जाऊन गारांची निर्मिती होते. त्यामुळे विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज आहे. आज, बुधवारी अमरावती, नागपूर, वर्धा येथे गारपीट होण्याचा अंदाज. गारपिटीसह विदर्भ, मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून पाऊस पडू शकतो. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल.
आणखी वाचा-आरोग्य तपासणी करणारे ‘हेल्थ एटीएम’! पुण्यातील वढू बुद्रुकमध्ये अनोखी सुविधा सुरू
अकोला ४३.७ अशांवर
राज्यात मंगळवारी अकोला येथे सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अमरावतीत ४२.८, बुलढाण्यात ४०.२, चंद्रपूरमध्ये ४२.४, वर्ध्यात ४३.०, वाशिममध्ये ४३.४ आणि यवतमाळमध्ये ४२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मराठवाड्यात औरंगाबाद ४०.८, बीड ४१.८, नांदेड ४२.०, उस्मानाबाद ४२.१ अंश तापमान होते. मध्य महाराष्ट्रात नगर ४०.९, जळगाव ४२.०, मालेगाव ४३.६ आणि सोलापुरात ४२.२ अंश तापमान होते. किनारपट्टीवर डहाणूत ३४.४, हर्णेत ३२.०, कुलाब्यात ३४.२, सांताक्रुजमध्ये ३३.७ आणि रत्नागिरीत ३२.८ अंश सेल्सिअस तापमान होते. कोरड्या हवामानामुळे राज्यभरात पारा चढाच राहणार आहे.