लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात २६ नोव्हेंबर रोजी पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र (पश्चिमी विक्षेप) तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम वायव्य आणि पश्चिम भारतावर दिसून येणार आहे. या थंड वाऱ्याचा आणि दक्षिणेकडून वेगाने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, राजस्थानचा दक्षिण भाग आणि गुजरातच्या पूर्व भागात संयोग होऊन गारपीट होण्याची शक्यता आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-पुण्यात नवीन इमारतींना बांधकाम परवानगी देणे थांबवा! खासदार सुप्रिया सुळे असे का म्हणाल्या?
दरम्यान, नैऋत्य अरबी समुद्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे राज्यभरात ढगाळ हवामान आणि हवेत बाष्पाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळी गार वारे वेगाने वाहत होते, त्यामुळे हवेत गारवा होता. दुपारी ढग कमी होऊन तापमानात वाढ झाली होती. सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. दरम्यान, शुक्रवारी विदर्भातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली. गोंदियात १५.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.
रविवारी गारपिटीचा इशारा
धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर