गारपिटीने तोंडचा घास पळविल्याने हवालदिल झालेला शेतकरी आता सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे.. आधीच कर्जाचा मोठा डोंगर असताना या अस्मानी संकटाने मुळापासून उखडल्याची मन:स्थिती झालेले काही शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत.. अशा स्थितीत सरकारच्या तातडीच्या मदतीबरोबरच बक्कळ पैसा असणाऱ्यांनी दानत दाखविली पाहिजे, ही अपेक्षा आहे. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे, अशा कष्टकऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला अन् गारपीटग्रस्तांना मदतीसाठी खारीचा वाटा उचलला..
कष्टकऱ्यांवर होणारे अन्याय, अत्याचार त्याचप्रमाणे सरकारदरबारी आपल्या मागण्या मांडण्यासाठी विविध कष्टकऱ्यांनी स्थापन केलेल्या अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा मदतीचा हात देण्यात आला. केवळ आपलेच प्रश्न व मागण्यांसाठी संघर्ष न करता समाजातील इतर घटकांबद्दलही संवेदना ठेवून संकटाच्या प्रसंगी त्यांच्या मदतीला धावून जाण्याचा एक धडाच या कष्टकऱ्यांनी घालून दिला आहे. संघर्ष समितीच्या माध्यमातून या कष्टकऱ्यांनी एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला.
मागील वर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे पूर्वीच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे होते. यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे पीकही चांगले आहे. अगदी एक-दोन आठवडय़ावर पिकाची काढणी होणार असतानाच गारपीट झाली. निसर्गाच्या या तांडवाने शेतकरी अक्षरश: मोडून पडला. शहरात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांना खरे तर त्याची कोणतीही झळ बसली नाही, मात्र या प्रश्नावर संघर्ष समितीने तातडीची बैठक घेतली. समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, पथारी पंचायत, कागद- काच- पत्रा कष्टकरी पंचायत, महात्मा फुले कामगार संघटना, टेम्पो पंचायत आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत गारपीटग्रस्तांना मदतीचा निर्णय झाला. त्यानंतर तातडीने समितीचे निमंत्रक नितीन पवार, नवनाथ बिनवडे, संपत सुकाळे, राजेंद्र चोरगे, बाळासाहेब मोरे, मधुकर भुजबळ, बापू कांबळे, विजय जगताप, हनुमंत बहिरट, राजेंद्र मोहोळ, सुधीर वैद्य यांच्या शिष्टमंडळाने उपनिवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. गारपीटग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी कष्टकऱ्यांनीही पुढाकार घेतला असल्याने आता समाजातील इतर नागरिकांनीही त्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. 

Story img Loader